नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पोलिसांना थेट आव्हान देणारा आणि भरदिवसा बंगल्यात दरोडा घालण्यात आल्याचा प्रकार सातपूरमधील जाधव संकुल येथे समोर आला आहे. दरोडेखोरांनी बंगल्यातील महिलांना शस्त्रांचा धाक दाखवत डांबले. त्यानंतर घरातील तब्बल ४० तोळे सोने दरोडेखोरांनी लंपास केले आहे. या सर्व प्रकाराने संपूर्ण सातपूरमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरवला असला तरी अद्याप काहीही सुगावा लागलेला नाही.
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकनगर मधील जाधव संकुल परिसरात अय्यप्पा मंदिराशेजारी उद्योजक बाबूशेठ नागरगोजे यांचा भगवानगड हा बंगला आहे. त्यांचे कुटुंब येथे राहते. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास बाबुशेठ हे नागरगोजे कामानिमित्त घराबाहेर गेले. त्यानंतर काही वेळातच एका अज्ञात इसमाने बंगल्यात प्रवेश केला. पिण्यासाठी पाणी द्यावे, अशी याचना त्याने केली. बाबुशेठ यांच्या पत्नी शहाबाई या पाणी आणण्यासाठी किचनकडे जात असतांनाच अचानक तीन ते चार इसमांनी बंगल्यात प्रवेश केला. शहाबाईंना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या सर्वांना हटकले. तसेच, दोन्ही सुना आरती आणि मंगल यांना जोरात आवाज दिला. ही बाब लक्षात घेत दरोडेखोरांनी आपल्याजवळील चाकू आणि बंदूक बाहेर काढली. तसेच, शहाबाई, आरती व मंगल यांच्या दिशेने हे शस्त्र त्यांनी रोखले. आरडाओरड केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही त्यांनी दिली. हा सारा प्रकार बघून घाबरलेल्या शहाबाई यांच्यासह आरती आणि मंगल यांनी आपल्या अंगावरील दागिने काढून दरोडेखोराच्या ताब्यात दिले. त्याचवेळी एका दरोडेखोराने या तिन्ही महिलांच्या हाताला व तोंडाला चिकटपट्टी लावली. या तिघांनाही देवघरात डांबण्यात आले. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील दागिने, मोबाईल व किंमती वस्तू लंपास केल्या.
भरदिवसा दरोड्याचा हा प्रकार कळताच पोलिस उपायुक्त विजय खरात, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संजय बारकुंड, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सतीश घोटेकर, मध्यवर्ती शाखा युनिट १,२ ३ चे अधिकारी यांच्यासह श्वान पथक व ठसे तज्ञ आदींचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तातडीने या दरोड्याचा तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरोड्याच्या या प्रकारानंतर परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी बंगल्याच्या परिसरात झाली. आमदार सीमा हिरे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी नागरगोजे कुटुंबियांची भेट घेतली. दरम्यान, दरोडेखोरांनी बंगल्यावर पाळत असल्याचे समोर आले आहे. बंगल्यात असलेला कुत्रा सध्या आजारी आहे. त्याचाही फायदा दरोडेखोरांनी घेतला. दरोडेखोर हे हिंदीत बोलत होते. आवाज किया तो मार डालेंगे, अशा पद्धतीने ते धमकावत असल्याचे शहाबाई, आरती व मंगल यांनी सांगितले आहे.