नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सेन्सोडाइन उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तत्काळ बंद करण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिले आहेत. तसेच, या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीपोटी तब्बल १० लाख रुपयांचा दंड करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
निधी खरे यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) सेन्सोडाइन उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात आदेश पारित केले. “जगभरातील दंतवैद्यांनी शिफारस केलेले” आणि “जगातली क्रमांक एकची संवेदनशील टूथपेस्ट” असे दावे या जाहीरातीत केले आहेत. यापूर्वी, ‘परदेशी दंतवैद्यांनी शिफारस केलेल्या’ असे दर्शवणाऱ्या सेन्सोडाइन उत्पादनांच्या जाहिराती बंद करण्याचे निर्देश सीसीपीएने दिले होते.
सीसीपीएने दूरचित्रवाणी, यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरसह विविध व्यासपीठांवरील सेन्सोडाइन उत्पादनांच्या जाहिरातींवर स्वतःहून कारवाई सुरू केली होती. या जाहिरातींमध्ये दाखवले आहे की, हे दंतवैद्य भारताबाहेर प्रॅक्टिस करत आहेत ( इंग्लंडमध्ये प्रॅक्टिस करत आहेत), सेन्सोडाइन उत्पादनांच्या वापरास मान्यता देत आहेत, उदाहरणार्थ सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ. आणि सेन्सोडाइन फ्रेश जेल दातांच्या संवेदनशीलतेपासून संरक्षण करते, सेन्सोडाइन हे “जगभरातील दंतवैद्यांनी शिफारस केलेले”, “जगातील क्रमांक एकची संवेदनशील टूथपेस्ट” आहे आणि 60 सेकंदात वेदनेला आराम देते हे “वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाल्याचा दावा केला आहे.
कंपनीने आपल्या दाव्याच्या सत्यतेबाबत दिलेल्या माहितीची तपासणी केल्यानंतर, कंपनीने “जगभरातील दंतवैद्यांनी शिफारस केलेले” आणि “जागतिक क्रमांक एकची संवेदनशील टूथपेस्ट” या दाव्याच्या समर्थनार्थ सादर केलेले दोन बाजार सर्वेक्षण केवळ भारतातील दंतचिकित्सकां संदर्भात केल्याचे सीसीपीएला आढळले.
जाहिरातींमध्ये केलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ किंवा सेन्सोडाइन उत्पादनांचे जागतिक स्तरावर महत्त्व सूचित करण्यासाठी कंपनीने कोणताही ठोस अभ्यास किंवा साहित्य सादर केले नाही. अशा प्रकारे, हे दावे कोणत्याही कारणास्तव किंवा औचित्य नसलेले आढळून आले. त्यामुळे, “जगभरातील दंतवैद्यांनी शिफारस केलेले” आणि “जागतिक क्रमांक एकची संवेदनशील टूथपेस्ट” असे दावे करणाऱ्या सेन्सोडाइन उत्पादनांच्या जाहिराती सात दिवसांच्या आत बंद करण्याचे आदेश सीसीपीएने दिले आहेत. तसेच, दहा लाख रुपयांचा दंडही भरण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, परदेशी दंतवैद्यांकडून समर्थन दर्शवणाऱ्या जाहिराती यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार बंद करण्याचे आदेश सीसीपीएने दिले आहेत.
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या संवेदनशीलतेचा विचार करता, सीसीपीएने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कठोर कारवाई सुरु केली आहे. या अंतर्गत 13 कंपन्यांनी त्यांच्या जाहिराती मागे घेतल्या आणि 3 कंपन्यांनी जाहिरातींमधे सुधारणा केल्या.