पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचे आज सकाळी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात त्यांनी अतिशय भरीव योगदान दिले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्या साथीने त्यांनी मुक्तांगण या संस्थेद्वारे सामाजिक कार्याचा आरंभ केला. राज्यभर त्यांच्या कार्याची व्याप्ती होती. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात १९४४ मध्ये झाला. त्यांनी फर्ग्यूसन महाविद्यालयातत शिक्षण घेतले. त्यानंतर १९६८मध्ये पुण्यातीलच बी जे मेडिकल महाविद्यालयात त्यांनी वैद्यकशास्त्राची पदवी घेतली. मुक्तांगण हे पश्चिम भारतातील सर्वात मोठे प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र म्हणून नावारुपाला आले. त्यांनी सामाजिक प्रश्नांवर वेळोवेळी विपुल लेखन केले. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्यांमध्ये पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, प्रमोद उदार यांचा समावेश आहे. डॉ. अनिल अवचट यांच्या या सामाजिक कार्याची वेळोवेळी दखल घेण्यात आली. त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाले. २०१३ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.