विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
बिहार आणि उत्तर प्रदेशात भजन–कीर्तनात रमणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची यादी मोठी आहे. काही तर स्वतः प्रवचनकार आहेत. काही लोक सेवेत असताना वेळ काढून आपली हौस भागवतात, तर काही अधिकारी चक्क नोकरी सोडूनही सत्संगात सामील झाल्याचे आपण बघितले आहे. अलीकडेच बिहारचे सेवानिवृत्त डिजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी श्रीमद्भागवत कथा सांगण्यास सुरुवात केली, तेव्हा अनेक जुन्या अधिकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
बिहारमध्ये 2009-2010 मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय पोलीस सेवेतील दबंग अधिकारी आनंद शंकर यांची बिहीरच्या डिजीपी पदावर नियुक्ती केली होती. तोपर्यंत आनंद शंकर यांचे राधाकृष्ण प्रेम सार्वजनिक नव्हते. पण एक दिवस ते अचानक रेल्वेतून गायब झाले आणि त्यांच्यासोबतच्या सुरक्षारक्षकांना देखील कळले नाही. तेथून ते थेट एका छोट्याशा गावात सुरू असलेल्या कीर्तनात सहभागी झाले.
आनंद शंकर ऑफिसमध्येही कपाळावर गंध लावून वगैरेच यायचे. पाटणामध्ये तर त्यांनी आपल्या निवासस्थानी अनेकदा हरीकीर्तन केले होते. सेवानिवृत्तीनंतर ते अनक दिवस ते बरसाना आणि मथुरामध्ये राहिले. गोसेवा हेच आपल्या जीवनाचे उद्दिष्ट्य आहे असे ते सांगतात आणि त्यादृष्टीनेच पुढचे आयुष्य जगायला सुरुवात केली. पटनामध्ये राहायचे तेव्हा अनेक लोकांनी त्यांना पटना जंक्शन येथील महावीर मंदिरातून बसमध्ये आपल्या घरापर्यंत जाताना बघितले आहे.
पौरोहित्य करायचा पांडेय परिवार
भारतीय पोलीस सेवेतील वरीष्ठ अधिकारी अरविंद पांडेय यांचे अख्खे कुटुंब विंध्याचल मंदिरात पौरोहित्य करायचे. यापूर्वीही ते अनेक धार्मिक संगीत कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावर दिसले आहेत. त्यांनी अनेक धार्मिक गिते लिहीली. आयुर्वेदाचाही प्रचार प्रसार ते करतात. ते सेवानिवृत्त असून सध्या अयोध्या, मथुरा आणि वृंदावन येथे सक्रीय आहेत. आणि त्यांच्या प्रवचनाचे व्हिडीयोदेखील सातत्याने व्हायरल होत असतात.