जयपूर (राजस्थान) – आपण ज्याला लाखोचा पोशिंदा म्हणतो त्या शेतकऱ्यालाच आज भारतात सर्वात जास्त विवंचना सहन कराव्या लागत आहेत. त्यातूनच कर्जबाजारीपणा आणि आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे. निसर्गाने साथ दिली नाही तरीही त्याच्या वाट्याला दुःखच आहेत. अश्यात एखाद्या शेतकऱ्याच्या पोटावर अधिकाऱ्याने लाथ मारावी, यासारखी दुर्दैवी घटना नाही.
शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम वर्षानुवर्षे होतच आहे. पण खरोखरच एखाद्या अधिकाऱ्याने शेतकऱ्याला पोटावर जोरदार लाथ मारल्याची घटना राजस्थान येथील जालोर जिल्ह्यात सांचोरमध्ये घडली. या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे. अश्या माजोरड्या अधिकाऱ्यावला तातडीने शिक्षा झाली पाहिजे व नोकरीवरूनसुद्धा काढले पाहिजे, अशी मागणी आता होऊ लागली आहे. या घटनेचा व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल होत असून व्हिडीयो काढणाऱ्याबद्दल देखील संताप व्यक्त होत आहे.
प्रतापपुरा भागात भारत माला प्रकल्पाअंतर्गत महामार्ग तयार होणार आहे. त्यात ज्या शेतकऱ्यांच्या जागेवरून हा मार्ग जाणार आहे, त्यांनी मोबदला मिळावा म्हणून आंदोलन केले. पण जुमानले नाही म्हणून शेतकऱ्यांनी महामार्गाच्या निर्मीतीचे कामच थांबवले. त्यावेळी या भागातील उपविभागीय अधिकारी भूपेंद्र यादन याने नरसिंहराव चौधरी या शेतकऱ्याला लाथ मारली. त्यानंतर शेतकरी आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. मुजोर अधिकाऱ्याने मात्र शेतकरी व गावकऱ्यांवरच मारहाणीचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांनी माझ्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. पोलीस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणला म्हणून शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
न्यायालयात प्रलंबित
गेल्या दोन वर्षांपासून या संदर्भातील खटला न्यायालयात प्रलंबित आहे. पण कोरोनामुळे त्यावर सुनावणीच झाली नाही. अश्यात शेतकरी आणि सरकारमध्ये वाद सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघायला कंपनीही तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काम थांबविण्याचा निर्णय घेतला.