मुंबई – मराठी साहित्यात ग्रामीण विनोदाच्या रंग-ढंगातून रंगत आणणारे आणि लेखन, कथाकथनातून अस्सल गावरान, मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेणारे साहित्यिक म्हणून द. मा. मिरासदार यांचे आज निधन झाले. त्यांची ‘मिरासदारी’ अबाधित राहील. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वाने निखळ आणि अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिरासदार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
द. मा. म्हणजेच दादासाहेबांनी मराठी साहित्यात आपल्या नावाप्रमाणेच मिरासदारी निर्माण केली. मराठीत ग्रामीण जीवनातील पार, कट्ट्यावरचा आणि अशा अनेक इरसाल नमुन्यांचा विनोदी खजिन्याचा पेटाराच दादासाहेबांनी उघडला. विनोदी लेखन, कथाकथन यातून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मनमुराद हसवले. कथाकथनातून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेला. तसेच ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही गेले. दादासाहेब उभे राहायचे, खर्जातील आवाजात कथा रंगवून सांगू लागले की त्या गावातले नमुने आरसा दाखवल्याप्रमाणे खळखळून हसू लागायचे. विलक्षण निरीक्षण शक्ती आणि लेखन-सादरीकरणातील निर्भेळपणा यामुळे द. मा. मिरासदार यांनी आपली अशी ‘मिरासदारी’ निर्माण केली. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्याने अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे.
खुसखुशीत कथांमधून बालचमूंपासून वयोवृध्दांना खदखदून हसविणारे, ज्यांच्या गोष्टी रसिकांना खिळवून ठेवत असत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. मराठी साहित्यात कथालेखक म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण जीवनावर त्यांनी लिहिलेल्या कथा विशेष गाजल्या. मराठी साहित्यात विनोदी साहित्याची परंपरा मोठी आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे यांनी निर्माण केलेली विनोदी साहित्याची समृध्द परंपरा मिरासदारांनी पुढे चालवली. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.