नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्मार्टफोन आता लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच अतिशय जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. दिवसातील अनेक तास हे स्मार्टफोन सोबतच जातात. मात्र, त्याचा योग्य वापर अतिशय महत्त्वाचा ठरतो. खासकरुन चोरट्यांनी हा स्मार्टफोनच त्यांचे साधन बनवला आहे. खासकरुन ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्टफोन वापरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर काय होऊ शकते, हे एका मोठ्या घटनेतून समोर आले आहे.
सेवानिवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचे जीवन जगणे सध्या मुश्किल झाले आहे. सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले 76 वर्षांचे आजोबा त्यांचे जिवन सुखाने जगत होते. पण, एका व्हिडिओ कॉलने त्यांच्या जीवनात मोठे वादळ आणले आहे. या ज्येष्ठ नागरिकाने मोबाईलवर आलेला व्हिडीओ कॉल घेतला आणि त्यांना धक्काच बसला. या कॉलवर समोरच्या बाजूने एक तरुण मुलगी बोलत होती. आणि ही मुलगी कुठलेही कपडे परिधान केलेली नव्हती. म्हणजेच हा न्यूड कॉल होता. कॉल रिसिव्ह केल्यावर न्यूड मुलगी अश्लील हावभाव करीत होती. सुमारे दीड ते दोन मिनिटे हा प्रकार सुरु होता. थोड्यावेळाने त्या मुलीचा पुन्हा फोन आला. तिने धमकीच्या रुपात या आजोबांकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे दिले नाहीत, तर त्यांच्या कॉन्टक्ट लिस्टमध्ये असलेल्या सगळ्यांना हा व्हिडीओ पाठवेन, अशी धमकीही या मुलीने या आजोबांना दिली.
त्यानंतर बिचारे आजोबा घाबरले. त्यानंतर त्यांना जेवणही जाईना, हे सांगायचं कुणाला हा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे ते अस्वस्थ राहू लागले. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही 10 ऑगस्टला त्यांना सायबर क्राईम इन्सपेक्टर जितेंद्र कुमार नावाने एक कॉल आला. त्याने कॉलवर सांगितले की तुमच्याविरोधात एका मुलीने तक्रार दाखल केली आहे. तुम्हाला भेटायचे आहे. याने हे आजोबा अजून घाबरले.
दुसरीकडून तो सायबर क्राईम बद्दल त्यांना धमकी द्यायला लागला. आजोबांनी घाबरुन फोन ठेवला तर दुसरा कॉल आला. यावेळी दुसरा माणूस होता, तो म्हणाला की तुमच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी यू ट्यूबवर टाकलेला व्हिडीओ डिलिट करण्यासाठी १७ हजार २०० रुपयांचा दंड भरावा लागेल. हे ऐकून आजोबांना कापरंच भरलं. काय करावं हे त्यांना सुचेना.
अखेर आजोबांनी घाबरुन संबंधित व्यक्चीच्या बँक खात्यात ती रक्कम जमा केली. त्यानंतर पुन्हा कॉल आला. त्यावेळी सांगण्यात आले की एक व्हिडीओ डिलिट झाला आहे, दुसरा व्हिडीओ डिलिट करण्यासाठी २२ हजार अजून द्यावे लागतील. नेमक्या त्याच वेळी दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्या हातातून फोन काढून घेतला. दरम्यान, या आजोबांसोबत बसलेल्या व्यक्तीला समोरची व्यक्ती त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचे लक्षात आले, त्याने फोन घेऊन स्वतःला इन्सपेक्टर म्हणवणाऱ्याला फोनवर भरपूर ऐकवले. त्यावेळी तुम्ही कायदा हातात घेऊ नका, महागात पडेल, असे पलिकडून तो गुन्हेगार सांगत राहिला. मात्र त्या आजोबांसोबत असलेल्याने त्याला चांगलेच सुनावले. त्यानंतर आजोबांना पुन्हा फोन आला नाही. त्यानंतर आजोबांच्या सोबत असलेल्याने सायबर क्राईमला हा सगळा प्रकार फोन करुन कळवला, आता नेमकी काय कारवाई होते याकडे या ज्येष्ठ नागरिकाचे लक्ष लागून आहे.
Senior Citizen Receive Video Call on Mobile Threat
Cyber Crime Nude Call Cheating Fraud Extortion