दुचाकीच्या धडकेत वृध्द ठार
नाशिक – भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ७५ वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाला. वृध्दावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. हा अपघात शिंगाडा तलाव भागात झाला होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुंदरलाल मोहनलाल शहा (रा.गुरूद्वारारोड) असे मृत वृध्दाचे नाव आहे. शहा दि.२८ मे रोजी शतपावलीसाठी घराबाहेर पडले असता हा अपघात झाला होता. गुरूद्वार रोडने ते पायी फेरफटका मारत असतांना अज्ञात दुचाकीने त्यांना धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने सारडा सर्कल येथील डॉ. आरशिया पठाण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ३० मे रोजीत्यांच्या प्रकृर्तीत बिघाड झाल्याने त्यांना सीएनएस हॉस्पिटल येथे हलविले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार आडके करीत आहेत.
—
सॅनिटायझर व्यवहारात साडे चार लाखांची फसवणूक
नाशिक – सॅनिटायझल स्प्रे पंप खरेदी विक्री व्यवहारात पुण्याच्या दोघांनी एकास साडे चार लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद कुमार जठार (३८) व नवनाथ पत्की (४० रा.दोघे बालाजीनगर,रेलविहार पुणे) अशी गंडा घालणाऱ्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी प्रमोद वासुदेव बागुल (रा.अंबिकानगर, कामटवाडे) यांनी तक्रार दाखल केली आहे.
संशयितांनी गेल्या वर्षी ८ जुलै रोजी बागुल यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी संशयीत आणि तक्रारदार यांच्यात सॅनिटायझर स्पे्र पंप खरेदी विक्री व्यवसायाबाबत बोलणी झाली होती. बागुल यांनी व्यवसायासाठी तयारी दर्शविल्याने ही फसवणुक झाली. बागुल यांना स्प्रे पंप खरेदीसाठी भागपाडण्यात आले. संशयीतांच्या आग्रहास्तव बागुल यांनी दि.८ ते १३ जुलै दरम्यान राजमाता एन्टरप्रायझेस आणि फोनपे च्या माध्यमातून ४ लाख ४९ हजार संशयीतांच्या खात्यात वर्ग केले. अनेक दिवस उलटूनही स्प्रे पंप न मिळाल्याने बागुल यांनी तगादा लावला असता संशयीतांनी स्प्रे पंप आणि पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच बागुल यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बेडवाल करीत आहेत.
—
गंगापूररोडला तरूणीची आत्महत्या
नाशिक – गंगापूररोड भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरूणीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर युवतीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मानसी मनोहर सुर्यवंशी (रा.फ्लॅट नं.२०२, दुसरा मजला युनियन बँक इमारत) असे आत्महत्या करणाºया तरूणीचे नाव आहे.मानसी सुर्यवंशी हिने बुधवारी (दि.२) आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये लोखंडी हुकला ओढणी बांधून गळफास लावला होता.त्यात तिचा मृत्यु झाला. ही बाब सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. सुनिल पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.