मुंबई – बिहारमध्ये ज्या घटना घडतात त्यांची तुलना जगातील कुठल्याच घटनांशी होऊ शकत नाही. कुठल्या प्रकारामुळे कुठले पाऊल उचलले जाईल, याचा किमान बिहारमध्ये तरी नेम नाही. एका वृद्धाच्या खात्यातून त्याच्या मृत्यूनंतर पैसे निघू शकले नाहीत म्हणून नातेवाईक त्याचा मृतदेह घेऊनच थेट बँकेत धडकले. या प्रकारामुळे बँकेत उपस्थित असलेले इतर ग्राहक घाबरून गेले आणि शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागले.
बँक आफ बडोद्याच्या मथुरापूर शाखेत घडलेल्या या घटनेत नातेवाईक आणि बँक व्यवस्थापकामध्ये मारहाणही झाली. सर्व नातेवाईक बँकेत शिरल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली. गोसाईंदासपूर पंचायतच्या मथुरापूर स्थित बँक आफ बडोदातील खातेधारक गणेश मंडळ यांची प्रकृती दोन वर्षांपासून खराब होती.
प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात भरती केले. त्याचवेळी त्यांना उपचारासाठी पैश्यांची आवश्यकता असल्याने त्यांच्या मुलाने विड्रॉल स्लीपवर वडिलांचा अंगठा घेतला आणि पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचला. पण व्यवस्थापकाने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर नगरसेवकाचे पत्र घेऊन यायला सांगण्यात आले. पत्र घेऊन त्यांचा मुलगा पुन्हा बँकेत पोहोचला पण तरीही बँकेने पैसे दिले नाहीत.
याचदरम्यान वृद्धाचा रुग्णालयात मृत्यू झाला. अंत्ययात्रा निघून बँकेच्या आसपास पोहोचली असताना नातेवाईकांनी पुन्हा एकदा बँकेला विनंती केली. पण तरीही बँकेने पैसे दिले नाहीत. त्यामुळे नाराज झालेल्या जमावाने बँकेच्या बाहेर नारेबाजी केली. त्यांचा आक्रोश बघून बँकेने 50 हजार रुपये दिले. पण खात्यात 53 हजार रुपये असल्याचा दावा मुलाने केला आहे.
दरम्यान, मृतदेह घेऊन नातेवाईक बँकेत आल्याने चांगलाच गोंधळ उडाला. एकतर जमाव जास्त असल्याने सुरक्षा रक्षकाच्याही हाताबाहेर परिस्थिती गेली होती. याठिकाणी नातेवाईकांनी बँकेचे व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळही केली.