इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुलांनी आणि सुनांनी वाऱ्यावर सोडल्यानंतर किंवा वृद्धाश्रमात पाठवल्यानंतर आई-वडिलांचे होणारे हाल आपण बघतच आहोत. न्यायव्यवस्था आई-वडिलांसाठी उभी असली तरीही फारशी कुणाची हिंमत होत नाही. पण उत्तरप्रदेशातील एका व्यक्तीने आपल्या मुलांना चांगलाच धडा शिकवला आहे.
उत्तरप्रदेश येथील ८५ वर्षीय नत्थू सिंग यांनी संपूर्ण देशापुढे एक आदर्श घालून दिला आहे. ४ मुली, १ मुलगा, जावई, सुना यांच्यापैकी कुणीही आपल्याला विचारत नाही म्हणून ते आश्रमात दाखल झाले. आश्रमात दाखल झाल्यावर तर मुलांनी लक्षच देणं सोडून दिलं. मुलगा सरहानपूर येथे आपल्या कुटुंबासोबत राहतो. तो येऊनही बघत नाही. मुली आणि जावई तर साधी विचारपूसही करत नाहीत. त्यामुळे हताश झालेल्या नत्थू सिंगने एक धाडसी निर्णय घेतला.
त्यांनी आपल्या संपत्तीतून मुलांना बेदखल करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने त्यांनी एक मृत्यूपत्र तयार केले असून यात मुलांकडून त्यांनी अंत्यसंस्काराचे अधिकारही काढून घेतले आहेत. आपल्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचे अधिकार मुलांकडे नसतील, असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आधीच आपले देहदान केले आहे. वडिलोपार्जित संपत्ती तर त्यांनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे अर्थात मुख्यमंत्री उत्तरप्रदेश या नावाने केली आहे. आपल्या मृत्यूनतंर संपूर्ण संपत्ती सरकारला देण्यात यावी आणि या जागेवर शाळा किंवा रुग्णालय सुरू करण्यात यावी असे त्यांनी सांगितले आहे.
गरिबांवर उपचार व्हावे
नत्थू सिंग यांनी आपल्या जागेवर सरकारने शाळा किंवा रुग्णालय उभे करावे, असे सूचविले आहे. शाळा सुरू केल्यास याठिकाणी गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि रुग्णालय उभारल्यास गरिबांना उत्तम उपचार मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी सरकारकडून व्यक्त केली आहे.
सात महिन्यांपूर्वी आश्रमात
मुलांनी वाऱ्यावर सोडल्यानंतर नत्थू सिंग आपल्या घरात एकटेच पडलेले होते. त्यांच्याकडे लक्ष देणारं कुणीही नव्हतं. शेवटी सात महिन्यांपूर्वी ते एका वृद्धाश्रमात आले आणि तेथे राहू लागले. पत्नीच्या मृत्यूनंतर ते एकटे पडले होते. मुलगा सरहानपूरच्या शाळेत शिक्षक आहे, पण पुत्रधर्म निभावण्याचा त्याला विसर पडला आहे.
Senior Citizen Children’s Lesson Big Punishment