नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 1 ते 30 जून 2022 या कालावधीत राजस्तरीय लघुपट, माहितीपट आणि चित्रफित निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा खुली असून व्यावसायिक, हौशी चित्रपट निर्माते, व्हीडिओ निर्माते, यू ट्यूब ब्लॉगर, स्वयंसहायता बचत गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, तसेच नागरिक या स्पर्धेत सहभागी होवू शकतील. राज्यस्तरावर निवड होणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास एक लाख रुपये व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ पारितोषिकाचे स्वरूप 50 हजार रुपये व सन्मानचिन्ह असे राहील.
स्वयंसहायता महिला बचतगटाचे आदर्श काम, उत्कृष्ट ग्रामसंघ, उत्कृष्ट प्रभाग संघ, बचत गटाचा शास्वत व्यवसाय, बचत गटाच्या शास्वत व्यवसायासह गळाचे सामाजिक योगदान, बचतगटाच्या एकत्रित कामातून मोठया अडचणीवर केलेली मात, बचत गटाचा नाविण्यपूर्ण व्यवसाय, स्वयसहायता गटातील महिलांच्या बिगर शेतीपूरक व्यवसाय निर्मिती, बॅक आणि बचत गट यांच्या समन्वयातून शास्वत रोजगार निर्मिती तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील परिणामकारक यशकथा असे लघूपटासाठी विषय असतील.
महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून गरीब कुटुंबांच्या जीवनमानात बदल होत आहे. त्याच्या यशोगाथा दृकश्राव्य माध्यमातून चित्रीत करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रफित जिल्हास्तरावर सादर करण्याची अंतिम मुदत 15 जून 2022 आहे. जिल्हास्तरावर सहभागी एकूण स्पर्धकांपैकी उत्कृष्ट पाच स्पर्धकांना जिल्हा कक्षाकडून राज्यस्तरावर पाठविण्यात येईल. 30 जून 2022 पर्यंत अंतिम निवड प्रक्रिया होईल. चित्रफितीचा कालावधी जास्तीत जास्त सात मिनिटे असावा. तो एचडी दर्जाचा असावा.
चित्रफित अप्रकाशित असावी. लघुपट निर्मितीत व्यावसायिक, हौशी, स्वयंसहाय्यता समूह, ग्रामसंघ, प्रभागसंघ, ग्रामपंचायत, सामाजिक संस्थेसह नागरिक सहभागी होवू शकतील. अधिक महितीसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, टोकरतलाव रोड, नंदुरबार यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन सह जिल्हा अभियान संचालक,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवणोन्नती अभियान तथा प्रकल्प संचालक आर.पी.पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.