इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या नावावर अनेक सुपरहिट चित्रपट आहेत. अक्षय या इंडस्ट्रीत आला तेव्हा सुरुवातीच्या काळात त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप गेले होते. त्यानंतर त्याने कामबॅक केले. आणि मग त्याचे चित्रपट हिट जाऊ लागले. त्याच्यातील अभिनय कौशल्याला प्रेक्षकांनी दाद दिली. आणि त्याच्या नावावर अनेक हिट चित्रपट जमा झाले. यासोबतच वेगळ्या विषयाचे, धाटणीचे चित्रपट देण्यासाठी देखील अक्षय ओळखला जातो.
अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर अक्षय पुन्हा एकदा फ्लॉप चित्रपटांच्या गर्तेत सापडला आहे. गेल्यावर्षी त्याचे सलग चार चित्रपट फ्लॉप गेले आहेत. तर यावर्षी आलेला त्याचा पहिला चित्रपटही फ्लॉप झाला आहे. सलग पाच चित्रपट फ्लॉप दिल्यानंतर आता अक्षय म्हणतो की, माझे चित्रपट फ्लॉप गेले यात प्रेक्षकांचा काहीच दोष नाही तर मी स्वतःच प्रेक्षकांना ओळखायला कमी पडलो आहे.
अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने उलथापालथ केली. जवळपास १५० कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाची पहिल्याच दिवशी अत्यंत खराब कामगिरी होती. दुसऱ्या दिवशीही चित्रपटाची स्थिती जवळपास तशीच होती. गेल्या वर्षी सलग चार फ्लॉप देणारा अक्षय कुमारचा या वर्षी प्रदर्शित झालेला हा पहिला चित्रपट आहे आणि तोही फ्लॉप ठरला. यामुळे अक्षयच्या खात्यात सलग पाचव्या फ्लॉपची भर पडली आहे. या फ्लॉप चित्रपटाबाबत अक्षय कुमारने नुकतेच मौन सोडले आहे.
अक्षय कुमार म्हणतो की, हे माझ्यासोबत पहिल्यांदाच घडत नाही. जेव्हा तुम्ही चूक करता तेव्हा असे घडते. आपल्या चित्रपटांच्या फ्लॉपची जबाबदारी अक्षय कुमारने घेतली आहे. तो म्हणाला की, प्रेक्षकांची आवड बदलते आहे. मी ते समजून घेण्यात कमी पडलो आहे. त्याचा विचार करणे मला गरजेचे आहे. मी बॉलीवूडमध्ये आलो तेव्हा माझे सलग १६ चित्रपट फ्लॉप गेले. त्यानंतर मधल्या काळात सलग आठ चित्रपट फ्लॉप झाले. अॅक्शन चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याबाबत अक्षय कुमार म्हणाला, ‘माझ्या चाहत्यांना माझ्यात बदल हवा आहे आणि मी बदलणार आहे.
अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’ चित्रपटात इमरान हाश्मीही आहे. हा चित्रपट एका सुपरस्टार आणि एका चाहत्याच्या कथेवर आधारित आहे. ‘सेल्फी’ हा साउथचा सुपरहिट चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा रिमेक आहे. पहिल्या दिवशी ‘सेल्फी’ने २.५५ कोटी रुपये कमवले. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने थोड्या वाढीसह ३.३० कोटींची कमाई केली.