विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना संकटकाळात राज्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानांतर्गत सहभागी बचतगटांतील महिलांनी मास्क, सॅनिटायझरची निर्मिती व विक्री यासह विविध उपक्रम राबवून सुमारे ६० कोटी ०३ लाख रुपयांची विक्रमी उलाढाल केली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोरोनामुळे आर्थिक संकट असताना राज्यातील या महिलांनी स्वत:च्या कुटुंबाला आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच लोकांसाठी मास्क, सॅनिटायझरसारख्या जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करुन दिली आहे.
३४ जिल्ह्यातील ७३० स्वयंसहायता समुहामधील १ हजार ९८१ महिलांमार्फत नुकतेच ८.७८ लाख मास्क बनविण्यात आले असून ७.७६ लाख मास्कच्या विक्रीमधून १ कोटी १९ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. कोरोना संकटाच्या पहिल्या लाटेत या बचतगटांनी सुमारे १ कोटी १० लाख मास्कची निर्मिती करुन त्यांच्या विक्रीतून सुमारे १३ कोटी ३० लाख रुपयांची उलाढाल केली होती.
कोरोना संकटकाळात आवश्यक असणाऱ्या सॅनिटायझरची निर्मिती आणि विक्रीही बचतगटांमार्फत करण्यात आली. राज्यातील १९ जिल्ह्यातील ४० स्वयंसहाय्यता समूहांमधील १९९ महिलांमार्फत ८ हजार ०५९ लिटर सॅनिटायझरची निर्मिती केली असून ५ हजार ०४९ लिटर सॅनिटायझरच्या विक्रीमधून ११ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
कोरोना संकटकाळात शहरी भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भाजीपाला पुरवठा करण्याचे काम स्वयंसहाय्य्यता समुहांनी केले आहे. यामध्ये ३४ जिल्ह्यातील १ हजार ९६६ समुहातील ४ हजार १९६ महिला सहभागी असून त्यांनी ८ हजार ६४९ क्विंटल भाजीपाला विक्रीतून २ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. पहिल्या लाटेच्या काळातही महिला बचतगटांनी यामाध्यमातून १६ कोटी ७५ लाख रुपयांची उलाढाल केली होती.










