मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा-२०१८ आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा २०१७ मधील पात्र एकूण ७३७ उमेदवारांना जून-२०२१ पासून नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे मुलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
सदरचे प्रशिक्षण हे कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या कोरोना मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून सुरू करण्यात येईल, असे मंत्री श्री.वळसे- पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा २०१७ मधील ३२२ उमेदवारांचे प्रशिक्षण सत्र दि. २१ जूनपासून सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा २०१८ मधील एकूण ३८७ उमेदवार तसेच २०१७ च्या प्रतीक्षा यादीतील २२ उमेदवार व सत्र क्रमांक ११८ मधील मुदतवाढ मिळालेले ६ उमेदवार अशा एकूण ४१५ उमेदवारांचे मूलभूत प्रशिक्षण २४ जूनपासून सुरु करण्याचे गृह विभागाने प्रस्तावित केले आहे.