मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई झोनल युनिट (एमझेडयू) च्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नैरोबीहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या गिनी नागरिकत्व असलेल्या एका महिला प्रवाशाला विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासणीत, चेक-इन केलेल्या सामानात पांढऱ्या रंगाच्या पावडरचे तीन पॅकेट्स लपवलेली आढळली.
सदर पांढरी पावडर ही अंमली पदार्थ आहे या तार्किक समजुतीवरून, एनडीपीएस फील्ड टेस्ट किट वापरून त्याची चाचणी करण्यात आली. या पदार्थात कोकेन असल्याचे आढळून आले. जप्त केलेल्या प्रतिबंधित पदार्थाचे एकूण प्रमाण २,१७८ ग्रॅम होते, ज्याचे आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य अंदाजे २१.७८ कोटी रुपये आहे. अंमली पदार्थाचे पॅकेट जप्त करण्यात आले आणि एनडीपीएस कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार प्रवाशाला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.