इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सीमाशुल्क विभागाच्या मुंबई विभाग -3 येथील सीएसएमआय विमानतळ आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी 17 मे 2025 रोजी दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये एकूण 5.75 किलो सोनं जप्त केलं असून त्याची अंदाजे किंमत 5.10 कोटी रुपये इतकी आहे. हे सोनं संबंधित व्यक्तींच्या आतील कपड्यांमध्ये व जॅकेटच्या खिशामध्ये लपवलेले होते. या प्रकरणांमध्ये 2 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
पहिल्या घटनेत एका प्रतिक्षा कक्षामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला, तो कर्मचारी मार्गाने प्रस्थान क्षेत्रातून जात असताना अडवण्यात आले. त्याच्या आतील कपड्यांमध्ये लपवलेली मेणामधील सोन्याची भुकटी असलेली 6 पाकिटे हस्तगत करण्यात आली , ज्याचे निव्वळ वजन 2800 ग्रॅम (संपूर्ण वजन 2947 ग्रॅम) असून अंदाजे किंमत 2.48 कोटी रुपये आहे. हे सोनं त्याला एका विमानतळावर अस्थायी थांबा घेतलेल्या अर्थात ट्रांझिट प्रवाशाने दिल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
तर दुस-या घटनेत एक कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तीला, तो प्रस्थान क्षेत्रातील कर्मचारी बाहेर पडण्याच्या ठिकाणी जात असताना अडवण्यात आले. त्याच्या अंगावरील जॅकेटच्या खिशामध्ये लपवलेली मेणामधील सोन्याची भुकटी असलेली ६ पाकिटे हस्तगत करण्यात आली, ज्याचे निव्वळ वजन 2950 ग्रॅम (संपूर्ण वजन 3073 ग्रॅम) असून अंदाजे किंमत ₹2.62 कोटी आहे, . हे सोनं त्याला विमानतळावर अस्थायी थांबा घेतलेल्या अर्थात एका ट्रांझिट प्रवाशाने दिल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.