विशेष प्रतिनिधी, नाशिक
नाशिकरोड येथील भारत प्रतिभूति मुद्रणालय (सिक्युरीटी प्रेस)ने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सिन्नर, इगतपुरी आणि देवळाली कॅन्टॉन्मेंट बोर्ड या तीन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यासाठी निधी मंजूर केली आहे. या प्रत्येक हॉस्पिटलला ५० लाख रुपये यानिमित्ताने मिळणार आहेत. त्यामुळे या तिन्ही हॉस्पिटलवर अवलंबून असलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. अनेकदा ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वणवण भटकावे लागत आहे. त्यातच काही रुग्ण ऑक्सिजन न मिळाल्याने दगावत आहेत.
याची दखल घेत खासदार हेमंत गोडसे यांनी इंडियन सेक्युयिटी प्रेस कंपनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रेसच्या सी.एस.आर. फंडातून (सामाजिक उत्तरदायित्व निधी) देवळाली कॅन्टोमेंन्ट बोर्ड, सिन्नर आणि इगतपुरी येथील सरकारी हॉस्पिलमध्ये ऑक्सिजन प्लान्ट उभारणीसाठी निधी देण्याची विनंती केली. त्यास प्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या तिन्ही हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्लान्टसाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देत असल्याचे पत्र नोट प्रेसने दिले आहे. याकामी प्रेसमधील मजदूर संघाचे कामगार नेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुद्रे यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे. यामुळे लवकरच या तिन्ही हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्यांसाठी ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत.