विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतीय मार्केटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वापरलेल्या सेकंड हँड कारच्या विक्रीचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. नव्या कार खरेदी करण्यासोबतच जुन्या कार खरेदी करण्यावरही लोकांचा भर दिसतो आहे. वाढलेला खर्च आणि कमी बजेटमुळेच वापरलेल्या कार खरेदी करण्याचा निर्णयही योग्य ठरतो आहे.
खरे तर सर्वसाधारणपणे जुन्या कार खरेदी करणे म्हणजे डोक्याला ताप लावून घेणे अशी धारणा आहे. मात्र असे मुळीच नाही. जर तुम्ही पूर्ण विचार करून आणि कार कुठल्या परिस्थितीत आहे हे नीट तपासून व्यवहार केला तर कुठलेही नुकसान संभवत नाही. यातून केवळ पैश्यांची बचत होते असे नाही तर तुम्ही जेव्हा जुने वाहन विकता तेव्हा गुंतवणुकीचेही कमीत कमी नुकसान होते.
किंमत कमी
जुनी कार खरेदी करण्याचा सर्वांत मोठा फायदा हाच आहे की नव्या कारच्या तुलनेत किंमत अर्धी असते. आता तर अनेक कंपन्यांनी स्वतःच जुन्या गाड्यांचे शोरूम सुरू केले आहे. नवी कार खरेदी केली की तीन वर्षांच्या आत तिची किंमत कमी झालेली असते. ती सेकंड हँडमध्ये मोडायला लागते. जवळपास ६० टक्क्यांनी ही किंमत कमी झालेली असते.
अतिरिक्त खर्च नाही
जुने वाहन खरेदी करताना कारच्या किंमतीच्या व्यतिरिक्त कुठलाही अतिरिक्त खर्च नाही. नवी कार घेताना रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स, आरटीओशीसंबंधित खर्च करावा लागतो.
कंपनीकडून वॉरंटी
अनेक कंपन्यांनी जुन्या गाड्यांचे स्टोअर सुरू केल्यामुळे त्या स्वतःच १ वर्षाची वॉरंटी देत आहेत. यात मारुती, ह्युंदाई, महिंद्रासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. शिवाय जुन्या गाड्या खरेदी करताना विम्याचे प्रिमीयमही कमी भरावे लागते. तसेच कर्ज कमी काढावे लागत असल्याने इन्स्टॉलमेंटही कमी पडते.