मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील बहुतेक लोकांना दोन स्टॉक एक्सचेंजची माहिती आहे. एक बीएसई म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरा एनएसई म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बीएसई हे सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे, तर एनएसई हे भारतातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे. भारतातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्स्चेंजचे एकत्रित बाजार भांडवल सुमारे ४ ट्रिलियन डॉलर आहे. अशा या ४ ट्रिलियन डॉलरच्या एकत्रित बाजारासह स्टॉकबाबतचे निर्णय एका योगींच्या सांगण्यावरून घेतले गेल्याचे समोर आले असून, त्यामुळे गोंधळ उडाला आहे.
मार्केट रेग्युलेटर सेबीच्या आदेशानुसार, एनएसईचे माजी व्यवस्थापकिय संचालक आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्यावर हिमालयीन योगींचा प्रभाव होता. ज्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आनंद सुब्रमण्यम यांना ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसरचे सल्लागार आणि एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले. रामकृष्ण आणि इतरांविरुद्ध शुक्रवारी जारी केलेल्या अंतिम आदेशात सेबीने हा खुलासा केला आहे. सेबीने रामकृष्ण आणि इतरांवर दंडही ठोठावला आहे. सुब्रमण्यन यांच्या नियुक्तीमध्ये सिक्युरिटीज कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. आनंद सुब्रमण्यन यांची समूहाचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकाचे सल्लागार म्हणून नियुक्ती करताना सिक्युरिटीज कराराच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
चित्रा रामकृष्ण एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६पर्यंत एनएसईचे व्यवस्थापकिय संचालक आणि सीईओ होत्या. संबंधित योगींना त्या शिरोमणी म्हणायच्या. त्यांच्या मते योगी एक आध्यात्मिक शक्ती आहे आणि गेले वीस वर्षे ते त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टींवर मार्गदर्शन करत आहे. सेबीला १९० पानांच्या आदेशात योगींनी चित्रा रामकृष्ण यांना सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिल्याचे आढळले आहे. या प्रकरणी कारवाई करत सेबीने रामकृष्ण आणि सुब्रमण्यन तसेच एनएसई आणि त्यांचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण आणि इतरांवर दंड ठोठावला आहे. रामकृष्ण यांना ३ कोटी रुपये, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), नारायण आणि सुब्रमण्यन यांना प्रत्येकी २ कोटी रुपये आणि व्ही आर नरसिम्हन यांना ६ लाख रुपये दंड ठोठावला आहे. यासोबतच नियामकाने NSE ला सहा महिन्यांसाठी कोणतेही नवीन उत्पादन सादर करण्यासही मनाई केली आहे.
याशिवाय, रामकृष्ण आणि सुब्रमण्यन यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी कोणत्याही मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थेशी किंवा सेबीमध्ये नोंदणीकृत कोणत्याही मध्यस्थांशी संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. तर नारायण यांच्यासाठी हे बंधन दोन वर्षांसाठी आहे. याशिवाय, सेबीने एनएसईला १.५४ कोटी रुपयांचा स्थगित बोनस आणि रामकृष्ण यांना अतिरिक्त रजेच्या बदल्यात दिलेले २.८३ कोटी रुपये जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.