मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फेसबूक म्हणा, इन्स्टाग्राम म्हणा नाहीतर युट्यूब म्हणा, प्रत्येक दोन व्हिडियोनंतर एक व्हिडियो येतो आणि त्यात गुंतवणुकीचा सल्ला देणारे उभे होतात. गुंतवणुक कशी करावी आणि कुठे करावी, हा सल्ला जेवढ्या अधिकाराने हे लोक देतात, तेवढी त्यांंची तयारी अधिकृत नसते. त्यामुळे आता शेअर बाजार नियामक सेबीकडून अटी-शर्तींच्या माध्यमातून त्यांच्यावर बुलडोजर फिरवण्यात येणार आहे.
यासंदर्भात सेबीची अलीकडेच एक बैठक झाली असून आता अनोंदणीकृत गुंतवणुक सल्लागारांना घरी बसविण्याची पूर्ण तयारी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर आर्थिक सल्लागारांबाबत एक महत्त्वाचे परिपत्रक तयार करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यात सर्वसामान्य नागरिकांची मते जाणून घेण्यात येईल आणि एक मसुदा प्रसिद्ध करण्यात येईल. सेबीच्या अध्यक्ष माधवी बुच यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सोशल मीडियावरुन या सल्लागारांचा कारभार येत्या दोन वर्षांत दोन हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वीच हे दुकान ९०० कोटींच्या घरात होते. किमान १० ते ५० हजार फॉलोअर्स असले तरीही एका पोस्टसाठी ५ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंतची कमाई एक व्यक्ती करते. त्यामुळे लाखो फॉलोअर्स असलेले लोक किती ऐश करत असतील, याचा अंदाज येतो. विशेष म्हणजे हे सारे अनधिकृतपणे सुरू असल्यामुळे या कमाईचा उल्लेख कोणत्याही टॅक्समध्ये केला जात नाही.
सोशल मिडियाचे प्लॅटफॉर्म
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आर्थिक गुंतवणूक, वित्तीय सल्ला देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यूट्यूब, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, व्हाट्सअॅप आणि ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवरून या मंडळींकडून बाजारात गुंतवणूक करण्याविषयी सल्ले दिले जात असतात. हे सल्ले देणारे सल्लागार सेबीकडे नोंदणीकृत नसतात. बऱ्याचदा अशा लोकांकडून फसवणुकीच्या घटना घडलेल्या आहेत.