मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अडकलेल्या पैशांमुळे चिंतेत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी अतिशय दिलासादायक वृत्त आहे. कारण, त्यांचे अडकलेले पैसे आता लवकरच मिळणार आहेत. त्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीने पुढाकार घेतला आहे. सेबी तर्फे सन प्लँट अॅग्रो, सन प्लँट बिजनेस आणि रिमॅक रियल्टी या कंपन्यांच्या एकूण १५ मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी १९ लाख रुपयांपासून ते १.७ कोटी रुपये आरक्षित किंमत निश्चित करण्यात आली आहे. १५ मालमत्तांपैकी सन प्लँट बिझनेसच्या ९ , सन प्लँट अॅग्रोच्या ४ आणि रिमॅक रियल्टीच्या उर्वरित दोन मालमत्ता आहेत.
या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनी बेकायदेशीररित्या निधी जमवला होता. गुंतवणूकदारांचे अडकलेले पैसे काढण्यासाठी सेबी या मालमत्तांचा लिलाव करत आहे असे समजा. ११ मे रोजी सकाळी १०.३० वाजता ऑनलाइन लिलाव होणार आहे. एड्रॉयट टेक्निकल सर्व्हिसेसकडे ई लिलावाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बोलीदारांना त्यांची बोली लावण्यापूर्वी या मालमत्तांची स्वतंत्र छाननी करण्याची परवानगी दिली जाईल.
या मलमत्तांमध्ये पश्चिम बंगालमधील काही जमिनीचे भाग आणि फ्लॅट्सचा समावेश आहे, असे सेबीने नोटिशीत म्हटले आहे. सन प्लँट अॅग्रो कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करण्याच्या सेबीच्या आदेशाचे पालन केले नव्हते. त्यामुळे कंपनीच्या काही मालमत्ता सेबीने संलग्न केल्या होत्या.
डिसेंबर २०१४ मध्ये सन प्लँट अॅग्रोविरुद्ध ६९.३४ कोटी रुपयांची वसुलीसाठी संलग्न करण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती. डिसेंबर २०१५ मध्ये सन प्लँट बिजनेसविरुद्ध ५.७६ कोटी रुपयांच्या वसुलीचा आदेश जारी करण्यात आला होता.









