मुंबई – भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजेच सेबी या बाजार नियमाक संस्थेकडून गुंतवणूकदारांच्या पैशांची वसुली करण्यासाठी पुढील महिन्यात सन प्लान्ट अॅग्रो आणि सन प्लान्ट बिझनेस या कंपन्यांच्या १८ मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. या कंपन्यांनी १२ कोटी रुपयांहून अधिक आरक्षित मूल्यावर जनतेकडून अवैधरित्या पैसे जमवले होते.
सेबीने जारी केलेल्या नोटिशीनुसार, या मालमत्ता भूखंडच्या स्वरूपात पश्चिम बंगालमध्ये आहेत. या भूखंडांच्या विक्रीसाठी लिलाव आयोजित केला आहे. हा लिलाव १४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजेपासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ऑनलाइन होणार आहे. लिलावासाठीच्या १८ मालमत्तांपैकी ९ मालमत्ता सन प्लान्ट अॅग्रो आणि सन प्लान्ट बिझनेस या कंपन्यांच्या आहेत.
बोली लावणार्यांनी बोली जमा करण्यापूर्वी कर्जाचा बोजा, लिलावात ठेवण्यात आलेली मालमत्तांचे अधिकार आणि दाव्यांसदर्भात स्वतंत्र तपासणी करणे गरजेचे आहे. सेबीने यापूर्वी त्यांच्या काही मालमत्ता संलग्न केल्या होत्या. कारण त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह परत करण्याच्या निर्देशांचे पालन केले नव्हते. या प्रकरणात सेबीने डीमॅड आणि बँक खात्यांनाही संलग्न केले होते.