नवी दिल्ली – शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांसाठी चांगली बातमी आहे. शेअर विक्री केल्यानंतर एका दिवसातच रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची व्यवस्था सेबी या बाजार नियामक संस्थेने केली आहे. सेबीने एक परिपत्रक काढून शेअर बाजाराला पर्यायी आधारावर टी+1 निपटारा व्यवस्था स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. सेबीने पर्यायी आधारावर ही व्यवस्था लागू केली आहे. नवी व्यवस्था एक जानेवारी २०२२ पासून लागू केली जाईल. वास्तविक आर्थिक व्यवहार झाल्याच्या एका दिवसाच्या आतच या व्यवहाराची रक्कम खात्यात जमा करून प्रकरणाचा निपटारा करणे म्हणजेच टी+1 होय. सध्या शेअर बाजारात व्यवहाराचा निपटारा कामकाजाच्या दोन दिवसात केला जातो. त्याला टी+2 असे म्हणतात. शेअर बाजारातील व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांचा टी प्लस वन व्यवस्थेमुळे फायदा होणार आहे.
शेअर बाजारातील तज्ज्ञ म्हणाले, की सेबीच्या पर्यायी टी प्लस वन निपटारा प्रणाली सुरू करण्याच्या निर्णयामुळे ग्राहकांना मार्जिनची गरज कमी करण्यास मदत मिळेल. त्यामुळे तरल बाजारात किरकोळ गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळेल.या निर्णयाच्या फायदा आणि तोट्यावर बोलणे खूपच घाईचे ठरेल. कारण बाजारातील काही कार्यान्वयनाच्या मुद्द्यांचा सामना करावा लागू शकतो, असे मायवेल्थग्रो डॉट कॉमचे सहसंस्थापक हर्षद चेतनवाला म्हणाले. टी प्लस वन व्यवस्था निर्माण करण्याचा नियम शेअर बाजारातील सर्व सहभागींसाठी आवश्यक आणि स्वागतार्ह निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया लर्नअॅप डॉट कॉमचे संस्थापक आणि सीईओ प्रतीक सिंह यांनी दिली आहे. शेअर बाजारामध्ये ही व्यवस्था निवडण्याचा पर्याय आहे. परंतु जर एका बाजाराने टी+1 ही व्यवस्था निवडली आणि दुस-याने नाही तर त्याने थोडे संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल, असेही ते म्हणाले.







