मुंबई – मुंबई जवळच्या समुद्रात एका हॉटेलसदृश नौकेत (क्रूझ) अमली पदार्थ नियंत्रण संस्थेने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला आहे. एनसीबीच्या छापेमारीत कोकेन, हशिस आणि एमडीसारखे अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत कमीत कमी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जवळपास सात तास सुरू असलेल्या या कारवाईत हायप्रोफाईल आणि सेलिब्रिटिज गळाला लागले आहेत. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान यासह काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. अखेर आज दुपारी आर्यनसह मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट या तरुणांनाही एनसीबीने अटक केली. या तिघांची जे जे रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या तिघांना एक दिवसाची एनसीबीची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे तिघांनाही आजची रात्र कोठडीत काढावी लागणार आहे.
ठोस माहितीच्या आधारावरून एनसीबीने शनिवारी कोरडेलिया क्रूझवर छापा मारला. मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या या क्रूझमध्ये हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टी सुरू होती. एनसीबीचे अधिकारी प्रवाशांच्या रूपात क्रूझमधून प्रवास करत होते. ड्रग्ज पार्टी सुरू झाल्यानंतर एनसीबीने छापा मारला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. क्रूझवर उपस्थित प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. छापेमारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह एकूण ८ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची सकाळपासून चौकशी सुरू होती. या सर्वांनी अमली पदार्थ सेवन केले होते की नाही याची खात्री एनसीबीने केली. क्रूझला मुंबईला परत आणण्यात आले आहे.
https://twitter.com/ANI/status/1444542889598468096