इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात सरकारी काम कसे असते हे वेगळे सांगायची गरज नाही. देशातील अनेक घटनांमुळे सरकारी कामाची पोलखोल झाली आहे. चोर सोडून संन्यासाला फाशी अशी गतही अनेकदा झाली आहे. आताही असाच एक प्रकार छत्तीसगडमधील रायपूर येथे घडला आहे. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी (एसडीएम अर्थात प्रांत) चक्क जिल्हाधिकाऱ्यांनाच नोटीस जारी केली आहे. ही नोटीस चुकीने जारी केल्याचे लक्षात आल्यानंतर एसडीएम लविना पांडेय यांनी जिल्हाधिकारी डोमन सिंह यांना पत्र लिहून माहिती देत माफी मागितली आहे. तसेच भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
लविना पांडेय यांनी झालेल्या प्रकाराबद्दल सांगितले, की टंकणाच्या चुकीमुळे निवेदनाच्या जागी कारणे दाखवा नोटीस लिहिले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून वनहक्के पट्टे वाटपाची माहिती तातडीने मागविण्यात आली होती. माहिती लिहित असताना लिपिकाकडून टंकण करताना निवेदनाच्या जागी कारणे दाखवा नोटीस असे चिन्हांकित केले होते. ते कॉपी पेस्ट करण्यात आले होते. मी अत्यावश्यक बैठकीत व्यग्र असताना हस्ताक्षर करून ती माहिती पाठवली.
चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ दोन मिनिटांच्या आत सुधारणा करून ती माहिती पुन्हा पाठविण्यात आली. या चुकीबाबत संबंधित लिपिकाकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्याने आपल्या लिखित उत्तरात चुकीमुळे निवेदनाच्या जागी कारण दाखवा नोटीस चिन्हांकित झाले. असे लिहित लिपिकाने माफी मागितली.
जिल्हाधिकारी डोमन सिंह म्हणाले, की ही चूक आमच्या सर्वांच्या लक्षात आली होती. त्यांनी दोन मिनिटांतच पत्र ग्रुपवरून हटवून दुसऱ्या पत्राद्वारे माहिती पाठवली होती. पत्र पाहून ही टंकणाची चूक असल्याचे लक्षात येते. त्यांनी मला वैयक्तिकरित्या माहिती देत माझी माफी मागितली आहे.