नवी दिल्ली – देशातील कोरोनाविरोधातील लढा अद्याप संपलेला नाही. आरटीपीसीआर चाचणीसाठी रात्र-रात्रभर प्रयोगशाळेत उभे राहण्याच्या गेल्या वर्षीच्या परिस्थितीकडे आपण पुन्हा चाललो आहोत का, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण प्रयोगशाळेत गेल्या तीन आठवड्यांपासून १६-१६ तास कर्मचार्यांची ड्युटी सुरू असून, दररोज १०० हून अधिक नमुने जिनोम सिक्वेंन्सिंगसाठी येत आहे. नागरिक वेळीच सावध झाले नाही, तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
देशातील नागरिक अजूनही भानावर आलेले नाहीत. यामुळेच आपल्यासमोरील हे आव्हान आणखी वाढत आहे. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव समुह संसर्गाच्या स्थितीत पोहोचला तर आपल्याकडे प्रत्येकाची जिनोम सिक्वेंन्सिंग करण्याची व्यवस्थाच नाहीये. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॉयरोलॉजी (एनआयव्ही) मध्ये काम करणार्या वैज्ञानिकांचे हे म्हणणे आहे.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून रात्रं-दिवस जिनोम सिक्वेन्सिंग करणार्या शास्त्रज्ञांकडे फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील १२ राज्यांमधील नमुने पोहोचत आहेत. प्रयोगशाळेत पीपीई किट परिधान करून शास्त्रज्ञ हे नमुने वीस अंशाच्या बॉक्समधून बाहेर काढून त्यांचे जिनोम सिक्वेंन्सिंग करत आहेत.
शास्त्रज्ञ सांगतात, की गेल्या तीन आठवड्यापासून आमचे काम पाच पटीने वाढले आहे. पूर्वी २० ते ३० नमुने प्रतिदिन जिनोम सिक्वेन्सिंगसाठी येत होते. आता तर ही संख्या १२० हून अधिकवर जात आहे. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि दिल्लीवरून नमुने येत आहेत. नमुने तयार करण्यासाठी अनेक तास लागतात. नंतर मशिनमध्ये सिक्वेन्सिंग करण्यात येते. ही मशीन गेल्या वर्षी मार्चमध्ये खरेदी केली होती.
सामूहिक संसर्ग
ओमिक्रॉन विषाणूने बाधा झालेले अनेक रुग्ण देशात आढळत आहेत. मात्र याचा सामुहिक संसर्ग अद्याप झालेला नाही, असे नवी दिल्ली येथील आयजीआयबीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी म्हटले आहे. जे नागरिक परदेशातून भारतात आले आहेत, किंवा त्यांच्या संपर्कात आले आहेत असेच कुटुंबीय किंवा मित्र संक्रमित होत आहे. ओमिक्रॉनबद्दल आपल्याकडे खूपच कमी पुरावे आहेत. आपल्याला आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. परंतु तोपर्यंत नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
५ महिन्यांनंतर सर्वाधिक रुग्ण
ओमिक्रॉनसह दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी गेल्या पाच महिन्यात सर्वाधिक ८५ रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जवळपास पाच महिन्यांनंतर कोरोनाचा दैनिक संसर्ग दर ०.१५ टक्के आहे.









