कॅनबरा (ऑस्ट्रेलिया) – अनेकदा आपण मस्करीमध्ये आंघोळीची गोळी घे असे आपण मित्र-मैत्रिणींनी किंवा कुटुंबातील व्यक्तीला विनोदाने म्हणतो. पण, खरेच तसे झाले तर. हो ही काही कल्पना नाही. पण, आंघोळीच्या ऐवजी थेट व्यायामाचीच गोळी मिळाली तर. शास्त्रज्ञांनी आता हे शक्य करुन दाखविले आहे.
येथील संशोधकांनी विशेष मॉलिक्युलर सिग्नलचा शोध लावला आहे. हे औषध गोळीच्या रूपात मिळणार असून, त्याचा न्यूरोलॉजिकल फायदा होणार आहे. जसे की व्यायाम केल्यानंतर होतो. शिन्हुआ या चिनी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचे हे संशोधन बुधवारी प्रकाशित करण्यात आले आहे. या संशोधनामुळे व्यायामाचा फायदा आता एक गोळीही देऊ शकणार आहे, असा संशोधकांनी दावा केला आहे.
या आजारांवर फायदा
शास्त्रज्ञांनी सांगितले, की ही गोळी जीवनसत्वाच्या गोळीसारखी घेता येणार आहे. व्यायामाच्या वेळेदरम्यान मिळणारा मॉलिक्युलर मेसेज देणार आहे. शारिरीकदृष्ट्या व्यायाम करण्यास सक्षम नसणार्या व्यक्तींना या गोळीचा फायदा होणार आहे. अल्झायमय आणि पार्किसंस सारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना आजार बळावण्याची गती कमी होण्याचा या गोळीने फायदा होणार आहे.
मज्जातंतूना आराम
नाइन एंटरटेन्मेंट वृत्तपत्राला संशोधकांनी सांगितले की, जसे जसे वय वाढत जाते, आपले मज्जातंतू कमकुवत होत जातात. परंतु जर मॉलिक्युलर मेसेज पाठविला तर मज्जातंतू सुधारण्यास मदत मिळते. अल्झायमर आणि पार्किसंसग्रस्त रुग्णांना व्यायामाने स्मरणशक्ती आणि मोटर कोऑर्डिनेशनमध्ये सुधारणा होते, याबद्दल अनेक पुरावे मिळाले आहेत.
काही रुग्णच वापरू शकतात
संशोधकांनी या गोळीचा वापर करण्यासंदर्भात एक इशारा दिला आहे. भविष्यात अशा प्रकारची कोणतीही गोळी बनविली गेली, तर ती सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली जाऊ नये. ज्यांचे चालणे-फिरणे मर्यादित आहे, अशा रुग्णांनीच या गोळीचा वापर करावा.