मुंबई – देशात ओमिक्रॉनचा धोका वाढत चालला आहे. राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये रात्रीच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणार्या मुंबईतही कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आगामी दोन आठवडे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास कोरोनाची तिसरी लाट कोणीही रोखू शकणार नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. या वर्षाचा अखेरचा महिना असून, नव्या वर्षाचे स्वागत साजरे करण्याबाबतही तज्ज्ञांना चिंता सतावत आहे. या शक्यतांच्या पार्श्वभूमीवर कोरोना महामारीचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की, आगामी एक आणि दोन आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येईल किंवा नाही हे रुग्णवाढीच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. सध्या मुंबईसारख्या महानगरात अधिकाऱ्यांना कोरोना महामारीबाबत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. सध्या देशात कोरोना महामारीबद्दल वेगळेच वातावरण आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. परंतु देशातील आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास ही आकडेवारी इतकी धोकादायक दिसत नाहीय. परंतु तरीही हे आकडे भीतीदायकच आहेत.
मुंबईची परिस्थिती चिंताजनक
मुंबईमध्ये कोरोनाच्या सरासरी दैनंदिन रुग्णांमधील वाढ चिंताजनक आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहरात १८५ सरासरी दैनंदिन रुग्ण होते. दुसर्या आठवड्यात (७-१४ डिसेंबर) ही संख्या वाढून २१२ आणि तिसर्या आठवड्यात (१५-२१ डिसेंबर) रुग्णसंख्या २७० पर्यंत पोहोचली. २२ ते २६ डिसेंबरदरम्यान मुंबईमधील पाच दिवसांची सरासरी ६७१ वर पोहोचली आहे. ही वाढ गेल्या आठवड्याच्या तुलनेत १४८ टक्के आहे, हीच सर्वाधिक चिंताजनक बाब आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, अत्याधिक संक्रामक ऑमिक्रॉनमुळे कोरोना रुग्णांमध्ये सलग वाढ होत आहे. आपण जर या आकडेवारीवर नजर टाकली तर ती नव्या लाटेची सुरुवात असल्याचे संकेत आहेत. परंतु आपल्याला पुढील कल पाहण्यासाठी वाट पाहणे आवश्यक आहे.
जागतिक स्तरावर ओमिक्रॉन हा डेल्टा विषाणूची जागा घेत आहे. परंतु तो एक सौम्य आजार फैलावत आहे. त्याची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होणार्यांची संख्या वाढलेली नाही. भारतात विषाणूसह लसीकरणामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढलेली आहे. त्यामुळे तिसर्या लाटेची शक्यता कमीच आहे.
महाराष्ट्राच्या कोविड-१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी सांगतात की, कोरोना महामारी सुरू असताना उत्सव आणि लग्नसमारंभ वाढल्यामुळे मुंबईत रुग्णसंख्या वाढत आहे. लग्नसमारंभ, नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत हे रुग्ण वाढण्याचे प्रमुख कारण असू शकते. आता कोरोना रुग्णांची वाढ होणे स्वाभाविक आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता नाकारू शकत नाही.