पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर (वय ७९) यांचे आज येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वछ क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा गणित हा विषय आपल्या लेखनशैलीने सोपा करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे अतुलनीय योगदान आहे. गेले काही महिने त्यांना कॅन्सरचा पुन्हा एकदा त्रास सुरू झाला होता. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी आणि सहकारी म्हणून मंगलाताईंची खंबीर साथ लाभली.
गणिताच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या प्रख्यात गणितज्ज्ञ म्हणून त्यांचा परिचय सर्वांना आहे. गणिताशी संबंधित अनेक उपक्रम त्यांनी राबविले. गणितगप्पा , गणिताच्या सोप्या वाटा इ त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘संश्लेषणात्मक अंक सिद्धांत ‘ या विषयात डॉक्टरेट प्राप्त केली. त्यांच्या निधनामुळे गणित या विषयाला वाहिलेले एक समर्पित आयुष्य काळाच्या पडद्याआड गेले आहे.
विद्यार्थ्यांना गणिताची आवड निर्माण होण्यासाठी मंगलाताई यांनी विशेषत्वाने काम होते. त्यासाठी त्यांनी लिहिलेली गणिताच्या सोप्या वाटा, नभात हसरे तारे, पहिलेले देश, भेटलेली माणसं हे प्रवासवर्णन यासारखी त्यांची पुस्तकं विशेष गाजली होती. त्यांचे गणित विषयांवरील प्रभूत्वामुळे शासनाने बालभारतीच्या गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली होती. विद्यार्थ्यांना गणित सोपे करून कसे समजावता येईल याच्या अनेक गोष्टी त्यांनी त्या समितीच्या माध्यमातून सुचवल्या होत्या, ज्या नंतर अमलात आल्या.