नवी दिल्ली – कोरोना विषाणूपासून संरक्षणाच्या नियमांचे योग्यरितीने पालन केले नाही, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. परंतु दुसऱ्या लाटेत दररोज जितके रुग्ण नोंदविण्यात आले होते. त्या तुलनेत तिसऱ्या लाटेत प्रतिदिन निम्मे रुग्ण आढळण्याची शक्यता कोरोना महामारीशी संबंधित सरकारी समितीच्या एका सदस्याने व्यक्त केली आहे.
कोरोना मॉडलिंगबाबत काम करणाऱ्या सरकारी समितीचे वैज्ञानिक मनिंद्र अग्रवाल सांगतात, नवा अवतार उत्पन्न झाल्यास तिसरी लाट वेगाने फैलावू शकते. तिसऱ्या लाटेच्या अंदाजासाठी आशावादी, मध्यवर्ती आणि निराशावादी हे तीन प्रकार गृहित धरण्यात आले आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने गेल्या वर्षी रुग्णवाढीसंदर्भात अंदाज लावण्यासाठी सांख्यिकी मॉडेलचा वापर करून एका समितीची स्थापना केली होती. दुसऱ्या लाटेचा अंदाज न आल्याने समितीला टीकेचाही सामना करावा लागला होता.
दुसरी लाट केव्हा स्थिरावणार
अग्रवाल सांगतात, ऑगस्टमध्ये जनजीवन सुरळीत होण्याची शक्यता असून दुसरा कोणताही म्युटेंटच्या प्रादुर्भावाची शक्यता नाही, असे आम्ही आशावादी या अंदाजाच्या प्रकारात असल्याचे मानतो. दुसरा मध्यवर्ती अंदाज आहे. या प्रकारात लसीकरणाचा २० टक्के कमी प्रभावी असल्याचे मानतो. तिसरा अंदाज निराशावादी आहे. यामध्ये ऑगस्टमध्ये एक नवा, २५ टक्के अधिक संसर्गजन्य म्युटेंटचा फैलाव होण्याची शक्यता आहे. अग्रवाल यांनी सादर केलेल्या आलेखानुसार ऑगस्टच्या मध्यापर्यंत दुसरी लाट स्थिर होण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या लाटेत
तिसरी लाट ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान उच्चांकावर पोहोचू शकते. यामध्ये १,५०,००० ते २,००,००० च्या दरम्यान रुग्ण वाढू शकतात. कोविड मॉडेलिंगमध्ये सहभागी वैज्ञानिक एम. विद्यासागर सांगतात, तिसर्या लाटेत रुग्णालयात दाखल होण्याचे रुग्णांचे प्रमाण कमी असू शकते. ब्रिटेनमध्ये जानेवारीत ६० हजारांहून अधिक रुग्ण नोंदविण्यात आले होते. त्यामध्ये दररोज मृतांचा आकडा १,२०० होता. चौथी लाटेदरम्यान ही संख्या घटून २१ हजारांपर्यंत आली. त्यात फक्त १४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. पुरेसे लसीकरण झाल्याने रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांची संख्या कमी होती.