मुंबई – अनंत अशा आकाशगंगेत अब्जावधी ग्रह-तारे असून त्यांचा शोध घेण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ नेहमीच कार्यरत असतात. सूर्याप्रमाणेच आणखी एक तेजस्वी ताऱ्याचा शोध शास्त्रज्ञांना लागला असून यासंबंधी आणखी संशोधन सुरू आहे. सूर्यासारख्या या तरुण ताऱ्याच्या अभ्यासानुसार शुक्र, पृथ्वी आणि मंगळाच्या सुरुवातीच्या काळाप्रमाणे यात सूर्याच्या केंद्रातून होणारे उत्सर्जन, ताऱ्यांच्या वातावरणातील धूप याबाबत सखोल माहिती मिळाली आहे.
द अॅस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, आपण पृथ्वीच्या उत्पत्तीबद्दल खूप काही शिकलो आहोत, परंतु सूर्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल फारसे माहिती नसल्याने पृथ्वीवर जीवन कसे शक्य झाले हे कळत नाही. त्यामुळे आता नासा या अंतराळ संस्थेने अशा जवळचा तारा शोधला असून तो सूर्याच्या तारुण्याचे रहस्य उघड करू शकतो. तसेच तो सूर्याद्वारे पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास आणि येथील जीवनाचा विकास देखील प्रकट करणे शक्य होणार आहे.
संशोधकांचे म्हणणे आहे की, 4.65 अब्ज वर्षे जुना असलेला सूर्य हा एक तेजस्वी तारा आहे, परंतु सूर्य त्याच्या तारुण्याच्या काळात पृथ्वीवर जीवन शक्य करण्यात कोणत्या गुणधर्मांनी यशस्वी झाला हे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. आकाशगंगेमध्ये सूर्यासारख्या ताऱ्याचा शोध घेण्यात येत होता, त्यामुळे त्याच्या सुरुवातीच्या दिवसांचे रहस्य उलगडले जाऊ शकते. शास्त्रज्ञांच्या मते, कप्पा 1 सेटी हा देखील असाच एक तारा असून आपल्यापासून 30 प्रकाश वर्ष दूर असून 600 ते 750 दशलक्ष वर्षे जुना असल्याचा अंदाज आहे.