इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतातील अनेक राज्यांमध्ये दारूबंदी संदर्भात वेगवेगळे नियम आणि कायदे आहेत, त्यातच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात वाइन विक्री संदर्भात मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण महाराष्ट्र सरकारने किराणा दुकानांवर वाईन विक्रीला परवानगी दिल्याने त्याला मोठ्या प्रमाणावर जनमानसातून विरोध झाला होता. इतकेच तर विरोधकांनी देखील या प्रश्नी सरकारला धारेवर धरले होते. तसेच वाईन मध्ये किती टक्के मद्य किंवा अल्कोहोल असते? त्याशिवाय बिअर मध्ये किती टक्के अल्कोहोल असते? या संदर्भात चर्चा सुरू झाली. परंतु आता बिअर पिणे हे धोकादायक किंवा व्यसन ठरणार नाही ! असे सांगितल्यास कुणाचाही विश्वास बसणार नाही. ही गोष्ट सत्य आहे की, परदेशातील काही शास्त्रज्ञांनी अल्कोहोल विरहित बिअर शोधून काढली आहे. त्यामुळे या बिअरमुळे नशा येणार नाही, असे म्हटले जाते. परंतु अद्याप या संदर्भात संशोधन सुरू आहे कारण या बिअरची चव सध्याच्या बिअर इतकी चांगली नाही असे म्हटले जाते.
शास्त्रज्ञांनी अल्कोहोलमुक्त बिअर बनवण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. या पद्धतीने तयार केलेल्या बिअरचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची चव सामान्य बिअरसारखी असली तरी त्यामुळे नशा होत नाही. तसेच यासंबंधीचा अभ्यास ‘नेचर बायोटेक्नॉलॉजी मध्ये प्रसिद्ध झाला आहे. गेल्या काही वर्षांत डेन्मार्क आणि युरोपमध्ये अल्कोहोलिक बिअरच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. कोपनहेगन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर सोटीरिओस कंप्रानिस म्हणतात की, काही जणांना सध्याच्या अल्कोहोल-मुक्त बिअरची चव सपक आणि पांचट (पाणीदार ) वाटते. वास्तविक, जेव्हा बिअर गरम करून अल्कोहोल काढून टाकली जाते तेव्हा हॉप्समधून येणारा सुगंध देखील संपतो. आता बायोटेक कंपनी इव्होडियाबिओच्या संशोधकांनी अल्कोहोल-मुक्त बिअर तयार करण्यासाठी कोड क्रॅक केला आहे आणि हॉप्सच्या सुगंधाने समृद्ध बिअर तयार केल्याचा दावा केला आहे.
प्रोफेसर कंप्रानिस यांनी स्पष्ट केले की, अनेक वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी मोनोटेरपेनॉइड्स नावाच्या लहान रेणूंचा समूह तयार करण्याचा एक मार्ग शोधला आहे, जे हॉपी-चव देतात. जुनी चव परत आणण्यासाठी हे नंतर बिअरमध्ये जोडले जातात. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, अल्कोहोल-मुक्त बिअरची चव सुधारण्याव्यतिरिक्त, ही पद्धत विद्यमान तंत्रांपेक्षा अधिक टिकाऊ आहे. यापूर्वी कोणीही हे करू शकले नाही, त्यामुळे हे तंत्रज्ञान अल्कोहोलमुक्त बिअरसाठी गेम चेंजर ठरले आहे. सध्या हॉप्सच्या उत्पादनासाठी भरपूर पाणी लागते, जे हवामानास अनुकूल नाही. तथापि, या अल्कोहोल-मुक्त बिअर तयार करण्याच्या तंत्रात सुगंध टिकवून ठेवण्यासाठी हॉप्सचा क्वचितच वापर केला जातो. प्रो. सोटीरिओस कंप्रानिस यांच्या मते, अल्कोहोलमुक्त बिअर बनवण्याचे हे तंत्र आरोग्याच्या दृष्टीनेही खूप प्रभावी आहे. या पद्धतीने तयार केलेली बीअर आरोग्यासाठी फारशी हानीकारक नसते.