इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कॉलेज मध्ये रॅगिंग करणे ही सुमारे २५ ते ३० वर्षापूर्वी जणू काही वाईट प्रथाच पडली होती, परंतु सरकारने रॅगिंग विरोधी कायदा केल्याने या गैरप्रकाराला काही प्रमाणात गेल्या दहा-बारा वर्षांपासून आळा बसलेला दिसून येतो. तरीही काही कॉलेजमध्ये सीनियर विद्यार्थी हे ज्युनियर विद्यार्थ्यांचे रॅगिंग करताना असे आढळून आले आहेत. बिहार मध्ये देखील एका कॉलेजमध्ये असा प्रकार घडला असून या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पाटणा सायन्स कॉलेजच्या एका हॉस्टेलमध्ये रॅगिंगचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. वसतिगृहात रात्रीच्या वेळी बी.एस्सी.भाग एकच्या गणित विषयाच्या विद्यार्थ्याला विरोध केल्याबद्दल नाचवून मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सदर विद्यार्थ्याच्या वडिलांनी यूजीसीच्या अँटी रॅगिंग सेलकडे तक्रार दाखल केली असून नऊ सीनियर विद्यार्थ्यांवर आरोप केले आहेत. यूजीसीने कॉलेज प्रशासनाला पत्र लिहिल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
यूजीसीने या घटनेची चौकशी करून अहवाल मागवला आहे. प्राथमिक तपासानंतर कॉलेज प्रशासनाने नऊ विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढले असून अद्याप तपास सुरू आहे. तसेच तपासात दोषी आढळल्यास या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल. यात आझाद आलम, इरफान अली, युसूफ हुसैन, नवनीत कुमार, अमरजीत कुमार, अब्दुल्ला फैजल, शशी रंजन, विवेकानंद झा आणि रोहित सिंग अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी वसतिगृहाचे अधीक्षक संदीप गर्ग यांना पत्र लिहून कॉलेज प्रशासनाने त्यांना हटवून त्यांच्या स्तरावरूनही चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर पीडित विद्यार्थी खोली सोडून थेट आपल्या घरी गेला. यानंतर त्याच्या वडिलांनी थेट यूजीसीच्या अँटी रॅगिंग हेल्प लाइन सेंटरमध्ये तक्रार करत या घटनेची संपूर्ण माहिती दिली. सदर विद्यार्थ्याचा आरोप आहे की, सीनियर विद्यार्थ्यांनी आधी त्याला विचित्र डान्स करायला सांगितले. तसेच या असभ्य प्रकाराला विरोध केला असता त्याला मारहाण केली.
यूजीसीचे पत्र आल्यानंतर कॉलेजची स्तरावर चौकशी झाली. मात्र, याआधीही या खोलीत राहणाऱ्या सीनियर विद्यार्थ्यांनी त्याला अनेकवेळा खोली सोडण्याचे सांगितले होते. मात्र ज्युनिअर विद्यार्थी खोली सोडत नव्हता. यानंतर या विद्यार्थ्यासोबत रात्री उशिरापर्यंत खोली क्रमांक ४५ मध्ये रॅगिंग करण्यात आले. प्राचार्य डॉ. एस.आर. पद्मदेव म्हणाले की, यूजीसीकडून पत्र मिळाल्यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांशीही बोलणे झाले. पीडित विद्यार्थ्याची माहिती घेतल्यानंतर कारवाई सुरू आहे. या घटनेत सहभागी असलेल्या काही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल.