मुंबई – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मंगळवारपासून (१५ जून) ऑनलाईनरित्या सुरू होत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही शाळा ऑनलाईनच भरणार आहेत.
राज्यातील सर्व शाळांना गेल्या १ मे पासून राज्य सराकारने सुट्या जाहीर केल्या होत्या. १ मे ते १४ जून या दरम्यान शाळांना उन्हाळी सुट्या होत्या. मंगळवारपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. विदर्भातील तापमान जास्त असल्यामुळे २८ जूनपासून तेथील शाळा सुरू होणार आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीही ऑनलाईनरित्याच शाळा सुरू झाल्या. वर्षभर ऑनलाईन वर्ग भरल्यानंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणेही शक्य झाले नाही. त्यामुळेच राज्य सरकारने इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचे घोषित केले.
इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षाही राज्य सरकारने रद्द केल्या आहेत. या दोन्ही वर्गांतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करुन निकाल लावला जाणार आहे.
दरम्यान, शाळा नेमक्या कशा पद्धतीने सुरु कराव्यात, ऑनलाईन वर्ग घ्यावेत की पहिल्या गटात असलेल्या भागात शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात, नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत स्पष्टता नसल्यामुळे मुख्याध्यापक संभ्रमात आहेत.