नवी दिल्ली – गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरातील बहुतांश शाळा, महाविद्यालये बंद आहेत. केवळ मोजक्या ठिकाणी नियमांचे पालन करीत प्रत्यक्ष शाळा सुरू आहेत. अन्य ठिकाणी मात्र अद्यापही ऑनलाइन पद्धतीनेच विद्यार्थ्यांचे वर्ग घेण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय अनेक वेळा घेण्यात आले. परंतु कोरोनाचा संसर्ग कमी जास्त होत असल्याने हा निर्णय वारंवार लांबणीवर टाकण्यात आला किंवा स्थगित करण्यात आला, परंतु विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असल्याने आता शाळा सुरू करणे आवश्यक आहे.
दरम्यान, सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे लशीकरण व्हावे, असा विचार आरोग्य तज्ज्ञांकडून मांडण्यात येतो. परंतु लशींचा अपुरा पुरवठा, उपलब्ध व कौशल्यपूर्ण मनुष्यबळांची कमी, वैद्यकीय तंत्रज्ञान व साधनसामुग्री अभाव आदींचा विचार करता संपूर्ण देशभरातील शाळांमध्ये लशीकरण होण्यास प्रचंड वेळ लागणार आहे. तोपर्यंत शाळा बंद ठेवणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे लशीकरणापूर्वीच आता शाळा सुरू कराव्यात, असा विचार काही आरोग्य तज्ज्ञ, वैद्यकीय अभ्यासकांनी मांडले आहेत.
दिल्लीत ऑफलाइन वर्गांसाठी शाळा उघडण्यात आल्या आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये आधीच मोठ्या म्हणजे वरच्या वर्गांसाठी शाळा उघडण्यात आल्या आहेत. तसेच प्रशासनाच्या या निर्णयावर तज्ज्ञ, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये वाद सुरू झाला आहे. काही तज्ज्ञ असे म्हणतात की, कोरोना लस अद्याप मुलांसाठी आलेली नाही, त्यामुळे कदाचित शाळा उघडण्याचा हा योग्य निर्णय नाही. दुसरीकडे, काही तज्ज्ञांनी म्हटले आहे की, भारतातील सर्व मुलांना लशीकरण करण्यासाठी नऊ महिने लागतील आणि तोपर्यंत शाळा बंद ठेवल्या जाऊ नयेत. त्यामुळे मुलांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होईल.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्लीचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, भारतातील सर्व मुलांना लसीकरण करण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागेल. सहाजिकच पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत शाळा बंद ठेवता येणार नाहीत. त्यामुळे शाळा पुन्हा सुरू करण्याच्या निणार्याचे त्यांनी समर्थन केले आहे. कारण मुलांसाठी मित्रांचा संपर्क महत्त्वाचा आहे. मात्र शाळांमधील सर्व कर्मचारी सदस्यांना लसीकरण केले पाहिजे आणि दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत आणि विद्यार्थी शाळेच्या आवारात किंवा बाहेर पडत असताना गर्दी टाळण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. त्याचबरोबर काही शाळांमध्ये जास्त संसर्ग प्रकरणे नोंदवली गेली असतील तर त्या शाळा बंद केल्या पाहिजेत, असेही डॉ. गुलेरिया म्हणाले.