मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी शासनाने अनेकवेळा वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. दप्तरातील वजन कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. गेल्याच आठवड्यात तिसरी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांना वह्यांची पानं जोडण्याचा निर्णय झाला होता. आता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्येही वह्यांची पानं जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पानं समाविष्ट करण्याची घोषणा गेल्या वर्षी केली होती. त्यानंतर पुढील शैक्षणिक सत्रापासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने मागील आठवड्यात प्रसिद्ध केला. राज्य शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
खासगी आणि विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देण्यात येतील. पाठ्यपुस्तकांना दिलेल्या प्रश्नपत्रिका सराव, वर्गपाठ, गृहपाठ यांसाठी वेगळ्या वह्या ठेवण्यास परवानगी असणार आहे. इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांमधील कविता, धडा, घटक यानंतर विद्यार्थ्यांना नोंदी करता याव्यात यासाठी पुस्तकांना वह्यांची पानं जोडली जाणार आहेत. शिक्षक शिकवत असताना किंवा पाठ समजून घेत असताना या वह्यांच्या जोडलेल्या पानांवर माझी नोंद या सदराखाली विद्यार्थी लिहिणार आहेत. तसेच शब्दार्थ, महत्त्वाची सूत्रं, महत्वाचे संबोधन, महत्त्वाची वाक्य या पानांवर नोंद करुन ठेवायची आहेत.
पुस्तके विभागणार
याशिवाय इयत्ता पहिली ते आठवीची पुस्तके चार विभागात विभागली जाणार आहेत. यामध्ये सुद्धा काही वह्यांची पाने जोडली जाणार आहेत. पुढील शैक्षणिक सत्र 2023-24 पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. पण वह्यांची पाने जोडल्यामुळे पुस्तकांच्या किंमती वाढणार आहेत. समग्र शिक्षा योजनेअंतर्गत आणि खुल्या बाजारात पुरवठा होणाऱ्या सर्व पाठ्यपुस्तक मंडळाच्या मूल्यांकन सूत्रानुसार नव्याने मूल्यांकन करुन त्यानुसार पुस्तकांच्या किमती निश्चित करण्यात येतील आणि ही पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येतील.
School Textbooks Printing Government Order Change