पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची आता दर पाच वर्षांनी चारित्र्य पडताळणी करण्याचा निर्णय पुणे जिल्ह्यातील शाळांसाठी घेण्यात आला आहे. शाळेतील मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयीचे आदेशही प्रशासनाकडून शाळांना देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसात सातत्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. भिगवण इथेही जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलीवर अत्याचारी घटना उघडकीस आली होती. जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका विद्यार्थीनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्याने एक चौकशी समिती नेमण्यात आली होती.
चौकशी समितीने केलेल्या तपासणीत शिक्षण दोषी आढळून आला होता. त्यानंतर नराधम शिक्षकाचे निलंबनही करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल घेतली. शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, दर्शनी भागात हेल्पलाईन नंबर लावणे, तक्रार पेटी ठेवणे, यासारख्या उपाययोजना करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याबरोबरच, विद्यार्थ्यांनाही गुड टच – बॅड टच याबाबत प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांच्या माध्यमातून अत्याचारांच्या घटनांना आळा बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आदेशात नेमकं काय?
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी आवाहन करत शाळांना सूचना दिल्या आहेत. पालकांच्या लेखी परवानगीशिवाय विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्तीला भेटू देऊ नये, भेटण्याबाबत शाळेच्या सुरक्षारक्षकांना माहिती दिली जावी, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यास शाळेने पीडितेची बाजू घेत तिला मदत करावी, लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याची माहिती वरिष्ठ कार्यालयांनाही द्यावी, विद्यार्थ्यांना गोपनीयरीत्या तक्रार नोंदवता कशी येईल याची तजवीज करावी, विद्यार्थ्यांचे हात पोहोचतील अशा उंचीवर सिक्युरीटी बेल बसवाव्यात, एखादी तक्रार प्राप्त झाल्यास त्यावर त्वरीत कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर चाईल हेल्पलाईन नंबर १०८९, पोलिसांचा नंबर १००, महिला सुरक्षा नंबर १०९० आणि इमर्जन्सी नंबर ११२ याबाबतचे फलकही लावले जावेत, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
School Teachers Character Certification Compulsory
Pune Education Zilha Parishad CEO