मुंबई – राज्यात येत्या १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असतानाच कोरोनाच्या नव्या अवताराने दस्तक दिली आहे. त्यामुळे पुन्हा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. यासंदर्भात आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवा अवतार ओमिक्रॉन आढळून आला आहे. तो अत्यंत संसर्गजनक आणि घातक असल्याचे सांगितले जात आहेत. मुंबई एकूण ८७ जण अफ्रिकेतून आले आहेत. या नव्या अवताराला कसे तोंड द्यायचे यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पुन्हा निर्बंध लादायचे की आणखी काही या पर्यायांवरही विचार करण्यात आला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र नोदी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी आणि त्यानंतर पुढील निर्णय घ्यावा, असे बैठकीत निश्चित करण्यात आले. त्यानुसार आता मुख्यमंत्री ठाकरे हे पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत.
तर, राज्यभरातील पहिलीपासूनचे सर्व शाळेचे वर्ग सुरू करण्यास अवघे दोन दिवसच शिल्लक आहेत. आरोग्य विभागाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना आणि नियमावली प्रसिद्ध केले आहे. पण, ओमिक्रॉनमुळे शाळा सुरू होणार की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. याबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. शाळा सुरू करुन पुन्हा बंद करावे लागण्याची चिन्हे लक्षात घेऊन याबाबतचा निर्णय सावधगिरीने घ्यावा, असे मत काही मंत्र्यांनी माडले. त्यास अनेकांनी दुजोरा दिला आहे. याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तत्पूर्वी याविषयी चाईल्ड टास्क फोर्सच्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे आता १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार नसल्याचे तूर्त स्पष्ट होत आहे.