मुंबई – शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणाचे आतापर्यंतचे निष्कर्ष हाती आले आहेत. राज्यातील ८५ ते ८६ टक्के पालकांनी शाळा सुरू करण्याच्या बाजूने कल दिला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. मुले घरातच असून ऑनलाईन शिक्षणात खऱ्या शिक्षणाचा आनंद आणि महत्त्व मिळत नसल्याचे पालकांचे मत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली आहे. त्यामुळे पुन्हा शाळा सुरू करण्यात याव्यात का, यासंदर्भात शिक्षण विभागाकडून ऑनलाईन सर्वेक्षण केले जात आहे. नेटवर्कअभावी ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाची स्थिती अत्यंत वाईट आहे. म्हणूनच ग्रामीण भागातील ५० टक्क्यापेक्षा अधिक पालकांनी शाळा सुरू करण्यास मान्यता दर्शविली आहे. तर, शहरी भागातील ३५ टक्क्यापेक्षा अधिक पालकांना शाळा सुरू व्हावे असे वाटते आहे. आतापर्यंत सव्वा दोन लाखाहून अधिक पालकांनी सर्वेक्षणात सहभाग घेतल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे. हे सर्वेक्षण येत्या सोमवार (१२ जुलै) रात्री पर्यंत सुरू राहणार आहे. पालकांनी http://www.maa.ac.in/survey या लिंकवद्वारे सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.