मुंबई – शाळेत जाण्यासाठी आतूर असलेल्या चिमुरड्यांसाठी अत्यंत आनंददायी वृत्त आहे. कोरोनाच्या संकटामुळे सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेले वर्ग येत्या काही आठवड्यातच ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत. यासंदर्भात येत्या काही दिवसातच निर्णय होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याने शाळांवर निर्बंध आले. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू झाले. गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थी ऑनलाईनद्वारेच शिक्षण घेत आहेत. मात्र, आता लवकरच शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. दुसरीकडे लसीकरणाला वेग दिला जात आहे. अद्याप लहान मुलांची लस उपलब्ध नसल्याने त्यांचे लसीकरण झालेले नाही. मात्र, पहिलीपासून शाळा सुरू करण्यास हरकत नाही, असे स्पष्ट मत चाईल्ड टास्क फोर्सने मांडले आहे. तसा अहवाल आता राज्य सरकारला दिला जाणार आहे. या अहवालावर राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणि राज्य टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांच्यावर मानेची शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. ते पदावर पुन्हा रुजू होताच राज्य टास्क फोर्सची बैठक होण्याची चिन्हे आहेत. त्यात शाळांच्या सुरू होण्याला हिरवा कंदिल मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1463427629520801796?s=20
राज्याच्या चाईल्ड टास्क फोर्सची मंगळवारी रात्री बैठक झाली आहे. त्यात शाळा सुरू करण्यावर एकमत झाले आहे. लहान मुलांची लस उपलब्ध होताच ती थेट शाळांमध्येच देणे शक्य होणार आहे. सध्या शहरांमध्ये आठवीपासूनच्या शाळा सुरू झाल्या आहेत. तर, जेथे संसर्ग नाही तेथे पाचवीपासून शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, आता सरसकट पहिलीपासून शाळा सुरू केल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र, शाळा पूर्ण क्षमतेने सुरू राहणार की काही निर्बंध ठेऊन शाळा सुरू होण्यास परवानगी दिली जाते, याबाबत मतमतांतरे आहेत.
वाहनांचे काय
शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल बस, व्हॅन आणि रिक्षा यांनाही परवानगी द्यावी लागणार आहे. अन्यथा ऑफलाईन पद्धतीने सुरू होणाऱ्या शाळांना पालकांचा फारसा प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे राज्य सरकारला शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतानाच वाहतुकीबाबतही ठोस निर्णय जाहीर करावा लागेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.