मुंबई – कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तसेच शहरी भागातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिली.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले होते. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी ग्रामीण भागात पाचवीपासून तर शहरी भागात आठवीपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासोबत तसेच पीडियाट्रिक टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर येत्या 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन सुरक्षितपणे शाळा सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध असल्याचे प्रा.गायकवाड यांनी म्हटले आहे.
टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यातील हा तिसरा टप्पा आहे. या कालावधीत सुरक्षित वातावरणात शिक्षण सुरू राहण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शाळा आणि शिक्षकांचे शिक्षण मंत्र्यांनी कौतुक केले आहे. त्याचबरोबर यापुढेही कोविड-19 संदर्भातील दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली आहे. काही विद्यार्थी पहिल्यांदाच प्रत्यक्ष शाळेत येतील, त्यांचे आणि इतर विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे ही आपली प्राथमिकता असेल, असे त्या म्हणाल्या. याबाबत सातत्याने मार्गदर्शक सूचना करणाऱ्या टास्क फोर्सचेही प्रा.गायकवाड यांनी आभार व्यक्त केले आहेत.
https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1463825866010480647
राज्याच्या चाईल्ड टास्क फोर्सची नुकतीच बैठक झाली. त्यात शाळा सुरू करण्यावर एकमत झाले. लहान मुलांची लस उपलब्ध होताच ती थेट शाळांमध्येच देणे शक्य होणार आहे. सध्या शहरांमध्ये आठवीपासूनच्या शाळा सुरू झाल्या आहेत. तर, जेथे संसर्ग नाही तेथे पाचवीपासून शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, आता सरसकट पहिलीपासून शाळा सुरू केल्या जाणार आहेत. मात्र, शाळा पूर्ण क्षमतेने सुरू राहणार की काही निर्बंध ठेऊन याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
विद्यार्थी वाहतुकीचे काय
शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल बस, व्हॅन आणि रिक्षा यांनाही परवानगी द्यावी लागणार आहे. अन्यथा ऑफलाईन पद्धतीने सुरू होणाऱ्या शाळांना पालकांचा फारसा प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी शालेय वाहतुकीचाही ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे.