नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – देशात कोरोना महामारी पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व राज्य सरकारांकडून कठोर निर्बंध लावले जात आहेत. सर्वप्रथम शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि प. बंगालसह १५ राज्यांमध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यप्रदेशमध्ये ऑनलाइन शिक्षण घ्यायचे की ऑफलाइन, हा निर्णय विद्यार्थ्यांवर सोडण्यात आला आहे. एकंदरीत मुले पुन्हा एकदा घरात कैद झाली आहेत. ओमिक्रॉनबाधितांची सर्वोच्च पातळी फेब्रुवारीत गाठली जाण्याची शक्यता असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. कोणत्या राज्यात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत ते जाणून घेऊयात.
कर्नाटक – इयत्ता पहिली ते नववीच्या शाळा दोन आठवड्यांपर्यंत बंद राहतील. १० वी, १२ वीचे वर्ग सुरू असतील.
दिल्ली – सर्व शाळा ३ जानेवारीपासून ते पुढील अपडेटर्यंत बंद राहतील. सरकारने यलो अलर्ट जारी केल्याने कॉलेज तत्काळ बंद करण्यात आले.
हरियाणा – १२ जानेवारीपर्यंत शाळा, कॉलेज बंद
महाराष्ट्र – मुंबईमधील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद राहतील. जिल्हाधिकार्यांना त्या त्या जिल्ह्यांच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुणे, नागपूर, नाशिक, पालघर येथील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद राहतील. राज्यातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद.
तामिळनाडू – पहिली ते आठवीपर्यंतची शाळा १० जानेवारीपर्यंत बंद राहतील. ९ ते १२ वीच्या वर्गांसाठी संशोधित दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.
ओडिशा – प्राथमिक शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पश्चिम बंगाल – पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा, कॉलेज बंद राहतील.
राजस्थान – जयपूरमध्ये ९ जानेवारीपर्यंत पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद असतील.
बिहार – आठवीपर्यंतच्या सर्व शाळा बंद असतील. ९ ते १२ चे ऑफलाइन वर्ग ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
तेलंगण – शाळा, कॉलेज ८ जानेवारीपासून १६ जानेवारीपर्यंत बंद राहतील.
झारखंड – सर्व शाळा, कॉलेज १५ जानेवारीपर्यंत बंद राहतील.
गोवा – २६ जानेवारीपर्यंत सर्व शाळा, कॉलेज बंद राहतील.
पंजाब – सर्व शाळा, कॉलेज १५ जानेवारीपर्यंत बंद राहतील.
छत्तीसगढ – चार टक्के किंवा त्याहून अधिक पॉझिटिव्हीटी दर असलेल्या जिल्ह्यांतील शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील.
अनेक जिल्ह्यात शाळा बंद
राज्यात संसर्गाचा धोका ओळखून मुंबईत सर्व शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू राहतील. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाणे, पुणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या जिल्ह्यांमधील पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील राज्यांमध्ये महाराष्ट्रात ओमिक्रॉनबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. आगामी पंधरा दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घरात राहूनच मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
सीबीएसईची चिंता वाढली
सीबीएसई, आयसीएसईसह अनेक शैक्षणिक मंडळांकडून फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान परीक्षा आयोजित केल्या जातात. परंतु ओमिक्रॉनचा वाढता धोका पाहता शैक्षणिक मंडळांची परीक्षा प्रभावित होण्याची शक्यता आहे. मार्च, एप्रिलमध्ये होणार्या वार्षिक परीक्षेच्या वेळी परिस्थिती प्रतिकूल झाल्यास ऑनलाइन परीक्षा घेतल्या जातील. विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रातील कामगिरीच्या आधारावरून गुण दिले जातील, अशी घोषणा सीबीएसईने यापूर्वीच केली होती.