इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गाझियाबादमध्ये स्कूल बसमध्ये एका विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित दोषींवर कार्यवाई करण्याचे आदेश देत असताना सर्व शाळांना ‘रोड सेफ्टी क्लब’ तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक संस्थांमध्ये हे क्लब स्थापन करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यातील रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे. प्राधान्याने रस्ता सुरक्षा क्लब स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांना दिले. लखनौ येथे झालेल्या बैठकीत विविध विभागांचे सादरीकरण पाहून मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.
महिलांच्या सुरक्षेसाठी बसेसमध्ये ‘पॅनिक बटन’ बसवण्यात येणार : महिलांच्या सुरक्षेसाठी यूपी रोडवेजच्या बसमध्ये पॅनिक बटणे लावण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. रोडवेज बसमधून पार्सल आणि कुरिअर सेवा सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. योगी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत राज्यातील २६ हजारांहून अधिक गावे यूपी रोडवेजच्या बसने जोडली गेली आहेत. आता प्रत्येक गावाला जोडण्यासाठी काम करण्याची गरज आहे.
रोडवेजच्या ताफ्यात २ हजार कंत्राटी बसेसचा समावेश होणार: सीएम योगी यांनी यूपी रोडवेजला २ हजार कॉन्ट्रॅक्ट बसेसचा ताफ्यात समावेश करण्याचे निर्देश दिले. यासोबतच भविष्यात पाच हजार नवीन बसेसचा समावेश करून ताफ्याचा विस्तार करण्याची योजना पुढे नेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पुढील सहा महिन्यांत बुंदेलखंड आणि पूर्वांचलमधील सर्व प्रमुख नद्यांचे खनिज मॅपिंग करण्याचे आणि नवीन खाण क्षेत्रांचा जिल्हा सर्वेक्षण अहवालात समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.