मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी पुस्तकाची तीन भागात विभागणी केली जाणार आहे. मुख्य म्हणजे पुस्तकातच लिखाणासाठी वहीची पाने जोडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यावर विचारविनिमय सुरु असून लवकरच निर्णय होईल अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील जड दप्तरामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. लहान वयात क्षमतेपेक्षा जास्त ओझं पाठीवर आल्याने शरीरावर त्याचे विघातक परिणाम होतात. हे टाळण्यासाठी गेल्या काही वर्षात दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. आता पुन्हा हा विषय चर्चिला जात असून पाठ्यपुस्तकालाच लिखाणासाठी वहीची पाने जोडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. असे केल्याने विद्यार्थ्यांना लिखाणासाठी, मुद्दे काढण्यासाठी स्वतंत्रपणे वही बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही, असे केसरकर यांनी सांगितले आहे. शालेय शिक्षण विभाग या प्रस्तावावर विचार करत असून त्यातील सर्व बारकावे तपासल्यानंतरच हा निर्णय घेण्यात येणार आहे.
वही आणि पाठ्यपुस्तक एकत्रित केल्याने एकाच विषयासाठी दोन वही – पुस्तक बाळगण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि त्यांच्याबरोबर आर्थिक दृष्टीने पालकांची चांगली सोय होईल. काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारकडून एकात्मिक पुस्तक संकल्पनेवर विचार सुरु होता. वेगवेगळ्या विषयांचे धडे एकत्रित करुन त्याचे एक पुस्तक तयार करण्याची ही संकल्पना होती. आता पाठ्यपुस्तकालाच पाने जोडण्याची संकल्पनेवर विचार सुरु आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात येणार की नाही हे शिक्षण विभागाच्या विचारविनिमयानंतरच स्पष्ट होऊ शकेल.
School Books Will Big Changes Education Minister
Deepak Kesarkar