भोपाळ – कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर त्यात सामान्य ज्ञानाचे नानाविध प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अगदी समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास या विषयासह सर्व भाषा, विज्ञान, गणित आणि अन्य विषयाचा सखोल अभ्यास विद्यार्थी करतात. परंतु त्याचबरोबर चित्रपट तथा मनोरंजन क्षेत्र याचाही काही विद्यार्थी अभ्यास करतात. कारण एखाद्या वेळी चुकून या क्षेत्रातील प्रश्न विचारले गेले तर आपल्याला अडचण येऊ नये, असा त्यामागील उद्देश असतो. मात्र शालेय अभ्यासक्रमात तरी साधारणतः पाठ्यपुस्तकातील असे प्रश्न विचारले जातात त्यातही अलीकडच्या काळात मुलांचे सामान्यज्ञान वाढावे म्हणून वेगवेगळे प्रश्न विचारले जातात.
क्रीडा क्षेत्रातील प्रश्न विचारणे एक वेळ समजू शकते. त्याहीपलीकडे चित्रपट संबंधात प्रश्न विचारल्यास काही गैर वाटणार नाही. परंतु चित्रपट क्षेत्रातील एखाद्या अभिनेता किंवा आभिनेत्याच्या लहान मुलाचे नाव काय? असा प्रश्न विचारणे म्हणजे तर्कसंगत आहे का असा वादाचा मुद्दा होऊ शकतो. परंतु असा प्रश्न एका शालेय अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विचारला गेला आणि येथेच वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे या पुढे विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा गांधी लोकमान्य टिळक, अशा महापुरुषांच्या बरोबरच चित्रपटातील क्षेत्रातील व्यक्ती आणि त्या क्षेत्रातील त्यांचे नातेवाईक कोण याची सुद्धा माहिती ठेवावी लागेल की काय अशी उलट सुलट चर्चा आता सुरू आहे.
याला कारण म्हणजे मध्य प्रदेशातील खंडवा येथील एका खाजगी शाळेत इयत्ता सहावीच्या परीक्षेत बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाच्या पूर्ण नावाच्या प्रश्नाप्रकरणी शिक्षण विभागाने शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या प्रश्नाकडे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न म्हणून पाहावे, असे शाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
खांडवा शहरातील अॅकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलच्या इयत्ता ६ वी च्या सामान्य ज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेत करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या मुलाचे पूर्ण नाव लिहिण्याचा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर स्थानिक पालक-शिक्षक मंडळाने आक्षेप घेतला आणि इतर अनेकांनी प्रश्नपत्रिकेची प्रत विविध सोशल मीडियावर शेअर केली. दरम्यान, ही बाब सर्वांच्या निदर्शनास आली असून, विभाग संबंधित शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी संजीव भालेराव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
याप्रकरणी शाळेचे उत्तर आल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे ते म्हणाले. शहरातील पालक-शिक्षक संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत, विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या वीरांशी संबंधित प्रश्न विचारले जावेत. असे सांगत शाळेवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर शाळेच्या संचालिका श्वेता जैन यांनी सांगितले की, प्रश्नपत्रिका दिल्लीस्थित एका संस्थेने तयार केली असून आमची शाळा त्यांच्याशी संलग्न आहे.
आतापर्यंत शाळेतील एकाही विद्यार्थ्याच्या पालकांनी या प्रकरणी तक्रार केलेली नाही, असे जैन म्हणाल्या आणि जे विरोध करत आहेत ते शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक नाहीत. या प्रश्नाकडे केवळ ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले पाहिजे, असेही जैन यांनी स्पष्ट केले. मात्र या प्रश्नाचे किती विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर लिहिले हे मात्र समजू शकले नाही. त्यामुळे इतिहासातील तैमुर जितका प्रसिद्ध झाला नाही, तितका हा अलीकडचा बालक प्रसिद्ध झाल्याचे दिसून येत आहे.