गेल्या दिड वर्षापासून कोरोना महामारीमुळे देशातील बहुतांश राज्यांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा आणि महाविद्यालये बंद होती. हळूहळू काही राज्य पातळीवर शाळा उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोना महामारीमुळे मुलांच्या शिक्षणावरही मोठा परिणाम झाला आहे.कोरोनामुळे सर्व मुलांचे ऑनलाईन वर्ग सुरू होते. आता कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट लक्षात घेता, राज्य सरकारांनी त्यांच्या स्तरावर शाळा उघडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. १ सप्टेंबरपासून उत्तर प्रदेश, दिल्ली आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांनी शाळांमध्ये नवीन वर्ग सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत.
– उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशात ९ वी ते १२ वी पर्यंतच्या मुलांसाठी १६ ऑगस्टलाच शाळा उघडल्या गेल्या असून २४ ऑगस्टपासून ६ वी ते ८ वी पर्यंतच्या शाळा उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, त्याचवेळी, आता १ सप्टेंबरपासून, आता इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी शाळा उघडण्याचा आदेश आहे.
महाराष्ट्र : महाराष्ट्रात १७ ऑगस्टला शाळा उघडणार होत्या, परंतु कोरोनाचा संसर्ग पाहता राज्य सरकारने शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. ग्रामीण भागात मात्र ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेणे, विद्यार्थ्यांना शक्य नसल्याने काही ठिकाणी केरोनाचे नियम पाळून कमी विद्यार्थी संख्या वर्ग भरविण्यात येत आहेत. परंतु अद्यापही शहरी भागातील शाळा सुरू झालेली नाहीत. १ सप्टेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला होता. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली होती. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता अद्याप शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्याचे म्हटले आहे.
दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये १ सप्टेंबरपासून शाळा-महाविद्यालये आणि कोचिंग संस्था सुरू होतील, सर्व शाळा टप्प्याटप्प्याने उघडल्या जातील. मात्र, पहिल्या टप्प्यात केवळ ९ वी ते १२ वीच्या मुलांसाठी शाळा उघडल्या जातील. तसेच ८ सप्टेंबरपासून इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या मुलांसाठीही शाळा उघडल्या जाऊ शकतात. शाळा सुरू झाल्याबद्दल माहिती देताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, पालकांच्या संमतीशिवाय मुलांना शाळेत येण्यास भाग पाडले जाणार नाही. शाळांमध्ये शारीरिक अंतर काटेकोरपणे पाळले जाईल आणि यासाठी एसओपी जारी केला जाईल.
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात १ सप्टेंबरपासून माध्यमिक शाळाही सुरू होतील. यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ पन्नास टक्के ठेवली जाईल. मुलांना शाळेत जाण्यासाठी पालकांची संमती अनिवार्य असेल. प्रत्येकाने कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा आठवड्यातून दोन दिवस चालत होत्या, जे आता सर्व कामकाजाच्या दिवशी चालतील. १ ते ५ पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत आठवड्यानंतर निर्णय घेतला जाईल.
कर्नाटक : कर्नाटकातील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारी दरम्यान जवळपास १८ महिन्यांच्या अंतरानंतर पुन्हा सुरू झाल्या आहेत. कर्नाटक सरकार आता शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घोषणा केली की, या महिन्याच्या अखेरीस शिक्षण तज्ज्ञांना भेटून वर्ग १ ते ८ साठी शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतील. तर शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले की, ३० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सशी या विषयावर चर्चा केली जाईल. सध्या नववी ते विद्यापीठ पूर्व अभ्यासक्रमाचे वर्ग २३ ऑगस्टपासून सुरू झाले आहेत. तसेच इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
तामिळनाडू : तामिळनाडू सरकारने राज्यभरात कोरोना निर्बंध शिथिल करण्याची घोषणा २३ ऑगस्ट रोजी केली. मात्र, राज्य सरकारने पुन्हा आता लॉकडाऊन ६ सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. तरीही या काळात, सर्व महाविद्यालयांना १ सप्टेंबरपासून अध्यापन आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत रोटेशन तत्त्वावर काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.