विशेष प्रतिनिधी, पुणे
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नियोजित इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेला आहे. ही परीक्षा २३ मे रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली. याबाबतचे माहितीपत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीदरम्यान इयत्ता पाचवी आणि आठवीची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येते. यंदा पाचवीच्या ३ लाख ८८ हजार ५२४ तर आठवीच्या २ लाख ४४ हजार ३३६ अशा प्रकारे एकूण ८ हजार ६१२ शाळांमधील ६ लाख ३२ हजार ८६१ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. परीक्षा सर्व जिल्ह्यांमध्ये एका दिवशी होणार होती. विद्यार्थ्यांचे ओळखपत्रे शाळांना त्यांच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात आली होती.