मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील अनुसूचित जमातीची वर्ग १ ते ४ पर्यंतची प्रलंबित असलेली विशेष पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी वने व सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. येत्या एक महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
अनुसुचित जमातीच्या उमेदवारांच्या प्रलंबित पदभरतीबाबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने शासनाशी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला आहे. दिनांक १० मार्च २०२२ रोजी त्यांनी या विषयासंदर्भात विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. अनुसुचित जमातीची वर्ग १ ते ४ पर्यंतची प्रलंबित विशेष पदभरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह इतर प्राधिकरणांनी जाहिराती देवून पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. न्यायालयीन आदेशाप्रमाणे व दिनांक २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार शासकीय तसेच खासगी अनुदानित संस्थातील पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्रमांक ८९२८/२०१५ व इतर याचिकानुसार दिनांक ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सामान्य प्रशासन विभागाने दिनांक २१ डिसेंबर २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे अनुसुचित जमातीतील बेरोजगार उमेदवारांमध्ये असंतोष पसरला आहे, त्यामुळे ही प्रलंबित पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी श्री. मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली होती. या चर्चेदरम्यान तत्कालीन सामान्य प्रशासन राज्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे आश्वासन देवूनही ही पदभरती प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधले. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एका महिन्यात याबाबत त्वरेने जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असे आश्वासन श्री. मुनगंटीवार यांना दिले आहे.
Schedule Tribe ST Candidate Recruitment Decision
Job Vacancy Opportunity Employment