नवी दिल्ली – आयपीएस अधिकारी आणि माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. सिंग यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. विशेष म्हणजे, ही याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले आहे की, ज्यांचे घर काचेचे असते ते दुसऱ्यांवर दगड फेकत नाहीत. सिंग यांनी जवळपास ३० वर्षे पोलिस दलात सेवा बजावली आहे. असे असताना ते आता राज्य पोलिस दल आणि गृह मंत्रालय प्रशासनाच्या चौकशीवर विश्वास नसल्याचे सांगत आहेत. असा पवित्रा ते कसा घेऊ शकतात, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे.
आपल्याविरुद्ध सुरू असलेले खटले राज्याबाहेर चालविण्यात यावे, अशा मागणीची याचिका सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. ज्यांचे घर काचेचे असते ते दुसऱ्यांवर दगड फेकत नाहीत, असे ताशेरे ओढत न्यायालयाने सिंग यांना दणका दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानेच आपल्याविरुद्ध राज्य सरकारने चौकशीचे शुक्लकाष्ट लावल्याचे सिंग यांचे म्हणणे आहे. सिंग यांच्या वकीलाने युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फायदा झाला नाही.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1403231375759532038