मुंबई – इन्कम टॅक्स रिटर्न (आयटी रिटर्न) भरणे हे सर्वच कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक आणि महत्त्वाचे काम असते. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने ग्राहकांसाठी आयटीआर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक एसबीआयच्या डिजिटल किंवा मोबाईल बँकिंग अॅप ‘ योनो’ द्वारे हे करू शकतो. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे ही माहिती उपलब्ध करून दिली आहे. या म्हटले की, SBI आपल्या ग्राहकांना YONO अॅपच्या ‘Tax2Win’ वैशिष्ट्याचा वापर करून कर विवरणपत्र भरण्याची सुविधा देत आहे. यासाठी फक्त 5 कागदपत्रांची आवश्यकता आहे.
एसबीआय ग्राहकांना योनो अॅपद्वारे आयटीआर भरायचे आहे, त्यांनी आयटीआर दाखल करताना काही कागदपत्रे आवश्यक आहेत याची नोंद घ्यावी. मुख्य कागदपत्रे म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म 16, कर कपातीचे तपशील, व्याज उत्पन्नाचा पुरावा आणि कर बचतीसाठी गुंतवणूकीचा पुरावा यांचा समावेश आहे. एसबीआयच्या योनो अॅपद्वारे आपले आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी, प्रथम आपल्याला एसबीआयच्या योनो अॅपवर लॉग इन करणे आवश्यक आहे. यानंतर दुकाने आणि ऑर्डरच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर कर आणि गुंतवणुकीचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर Tax2Win चा पर्याय निवडावा लागेल. ITR भरण्याची तारीख 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे.